देवगड : भारत महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी आपण भविष्यातील अधिकारी असल्याचा मानस बाळगला पाहिजे. विवेकबुद्धीने अभ्यासाकडे लक्ष देऊन मनापासून विद्यार्थ्यांनी काम केले पाहिजे, तरच भारत लवकरात लवकर महासत्ता म्हणून नावारूपास येऊ शकतो, असे मत जामसंडे येथील श्री. मो. गोगटे हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केले.जामसंडे येथील सांस्कृतिक भवनामध्ये श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर आभाळे, संस्थेचे उपाध्यक्ष नारायण घाडी, स्नेहलता देशपांडे, माजी मुख्याध्यापक अरुण सोमण, मुख्याध्यापक विजयकुमार हिरवे, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रकाश गोगटे, पर्यवेक्षक माधव खाडीलकर, शाळा समिती अध्यक्ष सुजाता गोगटे, प्रसाद मोंडकर, संतोष कुळकर्णी, आदी उपस्थित होते. यावेळी शिंंदे म्हणाले की, विद्यार्थी वर्गाने अधिकाधिक अभ्यासामध्ये मेहनत घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे. देवगड जामसंडेचे विद्यार्थी हे नक्कीच देशाचे सनदी अधिकारी बनू शकतात. अशी क्षमता या विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यांना चालना देण्यासाठी शिक्षक व पालकांनीही विद्यार्थ्यांबद्दलची योग्य जबाबदारी पार पाडली पािहजे. तसेच गाव, शाळा व सार्वजनिक ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजेत. स्वच्छ भारत अभियानामध्ये विद्यार्थ्यांनीही सहभाग घेऊन योगदान दिले पाहिजे. स्वच्छता ही नेहमीच पारदर्शकता दाखविते. यामुळे जनतेनेही आपल्या कामातील वेळ बाजूला ठेवून स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेऊन योगदान दिले पाहिजे. तसेच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आजचे विद्यार्थी हे भविष्यकाळाचे नागरिक असणार आहेत. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाचा आतापासून विचार केला पाहिजे. तरच पुढील काळात सुरक्षा ही किती महत्त्वाची असते, हे दिसून येणार आहे. ज्या नागरिकांना समुद्रकिनारी वा अन्य ठिकाणी कुठेही संशयास्पद वस्तू आढळून आली, तर तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली पाहिजे. हे एक सज्जन भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. ते आपण बजावले पाहिजे.विद्यार्थी म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा, तशी मूर्ती घडते. या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांना योग्य आकार दिला पाहिजे व विद्यार्थ्यांनीही लोक काय करतात यापेक्षा आपण योग्यप्रकारे कोणते काम केले पाहिजे, अशा विवेकबुद्धीनेही काम केले, तर भारत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही, असे मत दत्तात्रय शिंंदे यांनी व्यक्त केले. बक्षीस वितरणचे वाचन विनायक ठाकूर, संजय गोगटे यांनी सूत्रसंचालन, माधव खाडीलकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) मोठा समुद्र किनारा : पोलिसांना सहकार्य करासिंंधुदुर्ग जिल्ह्याला प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्याचा आतंकवादी हे घातपात घडविण्यासाठी वापर करीत असतात. अशा पद्धतीत आतापर्यंत नागरिकांनी अलर्ट राहून जे काम केले तसेच काम यापुढेही केले पािहजे. पोलीस हे नेहमीच आपले कर्तव्य बजावतच असतात.पोलिसांना जनतेने सहकार्य केले पाहिजे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे प्रतिपादन.
अधिकारी होण्याचा मानस बाळगा
By admin | Updated: December 31, 2015 23:56 IST