ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी गावागावात नियुक्त करण्यात येणारी जेपीची (विशेष कार्यकारी अधिकारी) पदे नियुक्त करण्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे १२वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी शासनाने गेली चार वर्षे ही पदे न भरल्यामुळे सिंधुदुर्गनगरी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच जनतेचे हाल होत आहेत. कागदपत्रांच्या सत्यप्रतीसाठी विशेष कार्यकारी अधिकारी या पदाचा शिक्का मारून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मारावे लागणारे हेलपाटे सध्या ओरोस व सिंधुदुर्गनगरी येथे पहावयास मिळत आहे. गोरगरीब जनतेला व बेरोजगार तरूण- तरूणी, विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती करण्यासाठी अधिकारी हजर नसल्यामुळे भटकावे लागत आहे. आघाडी शासनाने प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांमधून यादी मागितली होती. त्यामुळे त्या मोठ्या व्यक्तीची संबंधित पोलीस चौकशी करून शासनाला अहवाल देण्यात आला होता. यामुळे नागरिक, विद्यार्थी यांची फार गैरसोय होत आहे. सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी ही पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
जेपींच्या रिक्त पदांबाबत नाराजी
By admin | Updated: June 7, 2014 00:35 IST