ऐश्वर्या खरातचे स्वप्नालीच्या पावलावर पाऊल!, शिक्षणासाठी झोपडीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:21 PM2020-09-02T16:21:06+5:302020-09-02T16:23:01+5:30
लॉकडाऊन कालावधीत गावी आलेल्या ऐश्वर्या खरात हिला इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने घरापासून एक किलोमीटरवर डोंगरामध्ये झोपडीच्या आडोशाला बसून आॅनलाईन अभ्यास करावा लागत आहे.
मिलिंद डोंगरे
कनेडी : स्वत:ला आत्मनिर्भर, कणखर आणि शक्तिशाली बनवायचे असेल तर अभ्यासाबरोबरच महत्त्वाकांक्षा, परिश्रम आणि प्रयत्न आवश्यक आहेत. हे सिद्ध करून दाखविण्यासाठी नाटळ थोरले मोहूळ येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे बीएस्सी नर्सिंगचे शिक्षण घेणारी ऐश्वर्या रामचंद्र खरात ही युवती सज्ज झाली आहे. मात्र, लॉकडाऊन कालावधीत गावी आलेल्या ऐश्वर्या खरात हिला इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने घरापासून एक किलोमीटरवर डोंगरामध्ये झोपडीच्या आडोशाला बसून आॅनलाईन अभ्यास करावा लागत आहे.
दारिस्ते येथील स्वप्नाली सुतार हिच्या झोपडीतील शिक्षणाबाबत माध्यमांनी प्रकाशझोत टाकल्यानंतर अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतची यंत्रणा हलली. तिला तिच्या घरापर्यंत इंटरनेटची सुविधा पोहोचविण्यात आली. तिचे झोपडीतील शिक्षण आता घरापर्यंत पोहोचले आहे.
स्वप्नालीप्रमाणेच दुर्गम अशा नाटळ गावातील ऐश्वर्या खरात ही युवती आहे. अभ्यासात हुशार असलेल्या व भविष्यात डॉक्टर बनण्याचे स्वप्न उरी घेतलेल्या या मुलीला परिस्थितीमुळे दुधाची तहान ताकावर भागवावी लागली. परंतु याही परिस्थितीत नर्सिंग कोर्सच्या माध्यमातून तिच्याकडे गरुडझेप घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. तिचे आई-वडील शेतकरी आहेत. शिक्षणाचा खर्च त्यांना पेलवणारा नाही. आपल्या गरिबीची झळ आपल्या मुलीला बसू नये म्हणून त्यांनी कर्ज काढून तिचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे शिक्षण
मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे ती बीएसस्सी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. तिचे नातलग कोणीही मुंबईत रहात नसल्याने ती वसतिगृहात राहते. लॉकडाऊन काळात मे महिन्यात त्यांना आपापल्या गावी जा असे सांगण्यात आले. परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असल्याने ती ५ मे रोजी गावी आली. ती लॉकडाऊन वाढत गेल्याने गावातच अडकली.... आणि तिकडे आॅनलाईन लेक्चर सुरू झाले.
असे असते ऐश्वर्याचे आॅनलाईन शिक्षण
गावातील घराकडे फोनला रेंज मिळत नाही तिथे इंटरनेट कुठून मिळणार? यासाठी डोंगर माथ्यावर फिरत असताना डोंगरात तिला इंटरनेट मिळाले. उन्हाळ्यात दिवसभर डोंगरावर झाडाखाली उभी राहून ती शिक्षण घेत होती. नंतर तिच्या वडिलांनी तिला एक झोपडी बांधून दिली. मोबाईल चार्जिंगचा प्रश्न येत असल्याने ती सकाळी ७.३० वाजता घरातून जाते ती दुपारी १ वाजता घरी येते. नंतर २ वाजता जाते ती सायंकाळी ४ च्या आसपास घरी येते. पूर्ण दिवस डोंगरातील त्या झोपडीतच जातो. लेक्चर नसेल त्या वेळेत ती सराव करते. अँड्रॉईड फोनचा प्रश्न तिच्या भावाने रक्षाबंधन दिवशी तो भेट दिल्याने सुटला.
झोपडीत डासांचा सामना
तिच्या शिक्षणाची दोन वर्षे पूर्ण झाली असून अजून दोन वर्षे बाकी आहेत. त्यानंतर सहा महिने सराव असणार आहे. सध्या ती या झोपडीत डासांचा सामना करीत आॅनलाईन शिक्षण घेत आहे. स्वप्नालीप्रमाणे तिलाही मदतीची गरज आहे. तिच्या पंखांना बळ देण्यासाठी मदतीची किनार लागणे आवश्यक आहे .