सातारा : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत राज्याच्या धर्तीवर आता कोरोनामुक्त गावाला बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. एक लाखाचे हे बक्षीस ११ तालुक्यांतील प्रत्येकी एका गावाला मिळणार आहे, तर प्रशासकीय मंजुरीनंतरही ५३ कोंटींचे काम वाटप थांबलेले. आता या कामांचे वाटप ८ मेपासून होईल, असाही निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण आणि स्थायी समितीची सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. सकाळी प्रथम जलसंधारण तर दुपारी स्थायीची सभा झाली. जिल्हा परिषदेतून अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायतचे अविनाश फडतरे, अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण समितीच्या सभापती कल्पना खाडे, समितीचे सदस्य उदयसिंह पाटील, सुरेंद्र गुदगे, शिवाजी सर्वगोड, वनिता गोरे, अर्चना देशमुख, सुनीता कचरे आदी सहभागी झालेले. तर तालुकास्तरावरून तेथील समिती सदस्य सहभागी झाले होते.
स्थायी समिती सभेत कोरोनामुक्त गावांसाठी बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रत्येक तालुक्यातील एका गावाला एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी नियमावली निश्चित केली जाणार आहे. यासाठी ११ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर २०२०-२१ मधील ५३ कोटी रुपयांच्या विविध कामांना मार्च महिन्यात प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. पण, बैठक न झाल्याने कामांचे वाटप झाले नव्हते. स्थायी समिती सभेत यावर चर्चा होऊन काम वाटपचा निर्णय घेण्यात आला.
दि. ८ मे रोजी बांधकामच्या उत्तर आणि ९ मे रोजी दक्षिण विभागाच्या ३ लाखांपर्यंतच्या कामाचे वाटप होईल. तर ३ ते १० लाखांपर्यंतच्या कामाचे वाटप १४ मे रोजी आॅनलाईन पध्दतीनेच होणार आहे, असे सांगण्यात आले. ३ लाखांपर्यंतची १५२४ तर ३ ते १० लाखांची ९६७ कामे होणार आहेत.
चौकट :
इन्सेटर मशिन शाळांत बसवा..
जलसंधारण सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये पावसाळ्यापूर्वी सातारा शहरातील जीवन प्राधिकरणच्या पाणी टाक्या स्वच्छ कराव्यात. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व्यवस्थित मिळावेत, असे सदस्यांनी सांगितले. तसेच या वेळी इन्सेटर मशिन्स माध्यमिक शाळेत बसवावीत, असे सुचविण्यात आले.
..................................................