रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील अंभेरी गावाजवळील कार्तिक स्वामींचे देवस्थान असलेल्या देवदरी घाट परिसरात करवंदे खाण्यासाठी युवकांची झुंबड उडत आहे.
डोंगरची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदांच्या जाळ्या देवदरी घाटातील डोंगर कपारीत मोठ्या प्रमाणात आहेत. दरवर्षी मे महिन्यामध्ये करवंद परिपक्व होण्यास सुरुवात होताच देवदरी घाट परिसरात करवंदे खाण्यासाठी युवकांची वर्दळ वाढते. करवंद आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहेत. परिपक्व झाल्यानंतर काळीकुट्ट दिसणाऱ्या करवंदामध्ये क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. याबरोबरच करवंदे खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते. कोरोनामुळे महाराष्ट्रभर लॉकडाऊन आहे. नोकरी व व्यवसायानिमित्त पुणे व मुंबईसह बाहेरील राज्यात कामानिमित्त असलेले अनेक नागरिक सध्या गावाकडेच आलेले आहेत. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर फिरण्यास शासनाने मज्जाव केला असल्यामुळे घरात बसून अनेक नागरिक वैतागले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन रानमेवा चाखण्याचा आनंद अनेकांकडून लुटला जात आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून अंभेरीसह परिसरातील साप, वेळू, पिंपरी, अपशिंगे, रहिमतपूर आदी गावांतील युवक-युवती करवंद खाण्यासाठी देवदरीतील डोंगरकपारीत फिरत आहेत.
फोटो :
अंभेरी (ता. कोरेगाव) जवळील देवदरी घाट परिसरात करवंदे खाण्यात युवक व्यस्त आहेत. (छाया : जयदीप जाधव)