लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील राजपथावर रात्रीच्या सुमारास युवकांकडून दुचाकीवर बसून स्टंटबाजी सुरू असते. यामुळे अपघात होऊ लागले आहेत. पोलिसांनी अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
राजपथावर रात्री नऊनंतर काही युवक दुचाक्या बेफामपणे चालवत येत असतात. तसेच हॉर्नचाही कर्णकर्कश आवाज करतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच अपघातही घडत असतात. अशा हुल्लडबाज युवकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच रात्री साडेदहापर्यंत काही ठिकाणी तरी पोलिसांची नियुक्ती करावी, म्हणजे संबंधितांवर कारवाई करता येईल, अशी मागणी होत आहे.
................................................
थंडीचा गहू
पिकाला फायदा
लोकमत न्यूज नेटवर्क
वरकुटे मलवडी : माण तालुक्यात सध्या थंडी वाढू लागली आहे. या थंडीचा गहू पिकाला फायदा होईल, असे सांगितले जात आहे. माण तालुक्यात रब्बी हंगामामध्ये सर्वाधिक ज्वारीचे पीक घेण्यात येते,र गहू, हरभरा अशी पिकेही घेण्यात येतात. सध्या गहू पीक चांगल्या स्थितीत आलेले आहे. शेतकऱ्यांनी पिकाला पाणी देणे सुरू केले आहे. त्यातच थंडी वाढत असल्याने गहू पिकाला फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे.
.....................................
महाबळेश्वरवाडीमधील
बंधाऱ्यात पाणीसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी परिसरातील बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फायदा होत आहे. गेल्या वर्षी महाबळेश्वरवाडी परिसरात सतत पाऊस सुरू होता. सततच्या पावसामुळे गावातून जाणाऱ्या ओढ्यावरील सर्वच बंधारे भरलेले होते. या बंधाऱ्यातील पाण्यावर पिके अवलंबून असतात. पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने पिकांना फायदा होणार आहे.
................................................
ऊसतोडणीला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेगाव : साताऱ्यासह बाहेरील जिल्ह्यांतील साखर कारखाने सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत सध्या वेगाने ऊसतोड सुरू असल्याचे दिसत आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होतो. सद्यस्थितीत अनेक कारखाने अजूनही सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावांत ऊसतोड मजुरांच्या खोपी दिसू लागल्या आहेत. तसेच शिवारात मजूर उसाची तोडणी करत आहेत. ऊसतोडणीला वेग आल्याचे दिसून येत आहे.
....................................................
घंटागाड्यांना उशीर
सातारा : सातारा शहरातील कचरा घंटागाड्यातून नेला जात आहे. पण, अनेक भागांत घंटागाड्या उशिरा पोहोचत आहेत. त्यामुळे नागरिकांना वाट पाहत थांबावे लागत आहे. शहरातील सर्वच पेठांतील कचरा घंटागाड्यांतून नेण्यात येतो. दररोज सकाळी कचरा नेण्यात येतो. पण, मंगळवार पेठेत तर सकाळी ११ नंतर घंटागाडी येते.
........