हेळगाव येथील शशिकांत शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी आरफळ कालव्यावर गेले होते. सध्या आरफळ कालवा भरून वाहात आहे. त्या मोठ्या प्रवाहाच्या पाण्यात सांबर पडला असल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. पाण्याच्या मोठ्या प्रवाहात जीव वाचवण्यासाठी व पाण्यातून बाहेर पडण्यासाठी सांबराची धडपड सुरू होती. अशा गंभीर परिस्थितीत शशिकांत शिंदे यांनी आपल्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. शिंदे यांच्यासह अवधूत पवार, यश पाटील, ओंकार जाधव, गणेश पाटील, जगदीश पवार, पवन जगदाळे, देवराज माळी आदी युवकांनी पाण्यात उडी घेत त्या सांबराला कालव्यातून काठावर बाहेर काढले.
वन विभागाला फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. वनक्षेत्रपाल ए. पी. गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेळगावच्या वनरक्षक मानसी निकम यांनी वनपाल भाऊसाहेब जाधव, वनमजूर संभाजी मदने यांनी सांबर ताब्यात घेऊन त्याला गोसावीवाडीनजीकच्या डोंगर पायथ्यालगत असलेल्या वनीकरणात सोडून दिले.
- चौकट
हेळगाव येथील युवकांची कामगिरी कौतुकास्पद आहे. अलीकडे वन्य प्राण्यांच्या हत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना हेळगाव येथील युवकांनी सांबराचा जीव वाचवला. इतरांनी याचा आदर्श घेऊन वन्यप्राणी व पर्यावरण संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा.
- मानसी निकम, वनरक्षक