सातारा : ‘घरात लहान मुले झोपली आहेत, दारू पिऊन दंगा करू नका,’ असे म्हटल्याच्या कारणावरुन एका तरुणाला मद्यपीने काठीने मारहाण करून रक्तबंबाळ केल्याची घटना साताऱ्यातील लक्ष्मीटेकडी परिसरात घडली. याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सलीम अल्लाउद्दीन शेख (वय ३५, रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार, सातारा) हे सेंट्रिंगचे काम करतात. रविवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घरी असताना त्यांची मुले झोपली होती. यावेळी त्यांच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या पटांगणात काहीजण मद्यप्राशन करून आरडाओरड करत होते. त्यावेळी सलीम शेखने तुम्ही दंगा करू नका, घरात लहान मुले झोपली आहेत’ असे सांगितले. याचा राग आल्याने सलीम शेखला शिवीगाळ करत काठीने मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आले.
याप्रकरणी सलीम शेखने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सय्यद शेख (रा. लक्ष्मीटेकडी, सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत.
.......................................................