खंडाळा : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्तारले ते सह्याद्रीच्या डोंगररांगातील कडेकपाऱ्यातून, घनदाट अरण्यातून आणि बळकट गडकिल्ल्यांतून. शिवरायांचा हाच ठेवा प्रत्यक्ष पाहण्याचा ध्यास घेऊन इतिहासाचा वारसा जपण्यासाठी खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्स सातत्याने प्रयत्न करीत असते. जागतिक योगदिनाचे औचित्य साधून या ग्रुपने माडगणी, कमळगड ते कोळेश्वर असा ट्रेक निवडक सभासदांसह आयोजित करून निसर्गाच्या सान्निध्यात योगाची प्रात्यक्षिके केली.
खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सने कमळगड ते कोळेश्वर असा अनोखा पायी प्रवास ट्रेकिंगचे नियोजन शाम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. या वेळी निवडक वीस सदस्यांना घेऊन राष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने डोंगरमाथ्यावर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून योगाची प्रात्यक्षिके घेतली. पायी प्रवासासह शारीरिक हालचाली, योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार यांसारखे व्यायाम घेतल्यामुळे आत्मबल वाढविण्याची प्रेरणा सर्वांना मिळाली. शिवाय दिवसभर चालण्याची शक्ती मिळाली.
कोट
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाची जाणीव मनामध्ये राहावी तसेच गडकिल्ल्यांची स्वच्छता राखल्याचे समाधान आहे. ट्रेकिंग मोहिमेचे आयोजन केल्याने शारीरिक स्थिती मजबूत राहण्यास मदत होते. याशिवाय रोजच्या धावपळीतून वेगळं काही केल्याचा आनंदही मिळतो. योग दिनाच्या प्रात्यक्षिकाने प्रत्येकाचे मन प्रफुल्लित झाले.
- संजयकुमार मुनगीनवार,
अधीक्षक अभियंता
२१खंडाळा योगा
खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सच्या सदस्यांनी सोमवारी जागतिक योगदिनी निसर्गाच्या सान्निध्यात योगाची प्रात्यक्षिके केली. (छाया : दशरथ ननावरे)