सचिन काकडेसातारा : सातारा पालिकेच्या दूरदृष्टीने आणि कठोर परिश्रमाने हाती घेण्यात आलेल्या कास योजनेच्या नवीन जलवाहिनीचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले आहे. ही केवळ एक जलवाहिनी नसून, सातारकरांची तहान भागवणारी अन् त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी आणणारी एक ‘जीवनवाहिनी’ ठरणार आहे. या प्रकल्पामुळे वर्षानुवर्षे भेडसावणारी पाणीटंचाईची समस्याही आता लवकरच संपुष्टात येईल.कास धरणाच्या भिंतीपासून सुरू होणारी २७ किलोमीटर लांबीची जलवाहिनी म्हणजे केवळ एक बांधकाम नाही, तर प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचा एक यशस्वी प्रकल्प आहे. पहिल्या सहा किलोमीटरचा टप्पा अत्यंत खडतर होता. डोंगरउतार, खडक आणि घनदाट जंगलासारख्या अडथळ्यांना सामोरे जात पालिकेने हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच कामाची गती वाढली आणि आतापर्यंत १९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले. उर्वरित काम पुढील चार ते पाच महिन्यांत पूर्ण होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाची जोडनवीन जलशुद्धीकरण केंद्र : शहराला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी सांबरवाडी येथे १६ एमएलडी क्षमता असलेल्या नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम पालिकेने हाती घेतले आहे.स्मार्ट मीटर : पाणी वापराचे अचूक मोजमाप, वितरण व्यवस्थापन करण्यासाठी आणि गळती थांबवण्यासाठी शहरात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २१ हजार पैकी ९ हजार मीटर बसवून पूर्ण झाले आहेत.
२४ बाय ७ दिवस..नवीन जलवाहिनी आणि जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढल्यानंतर पालिका एका पेठेत २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो टप्प्याटप्प्याने शहरात राबवला जाईल.
आणीबाणीसाठी अशीही व्यवस्थापाणीपुरवठा व्यवस्था अधिक सुरक्षित करण्यासाठी एक दूरगामी विचार करण्यात आला आहे. नवीन जलवाहिनी सुरू झाल्यावर कास व शहापूर योजनेची जुनी जलवाहिनी राखीव ठेवली जाणार आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनीमध्ये काही बिघाड झाल्यास किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही.
पाण्यावर तयार होणार वीज..डोंगरउतारावरून येणाऱ्या पाण्याच्या क्षितिज ऊर्जेचा वापर करून पालिकेकडून पावर हाऊस येथे एक मेगा वॅट क्षमतेचा लघु जलविद्युत प्रकल्प साकारला जाणार आहे. जलसंपदा विभाग अंतर्गत येणाऱ्या कोयना संकल्प चित्र मंडळ, पुणे येथे पालिकेने या कामाचा प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच प्रकल्पाचे काम सुरू होईल. या प्रकल्पामुळे पालिकेची वीजबिलावर होणारी वार्षिक सुमारे तीन कोटी रुपयांची बचत होणार आहे.
कास पाणी योजना हा सातारकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले. हे काम गतीने सुरू आहे. याशिवाय शहरात स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. ही पाणी योजना सातारकरांच्या भविष्याचा विचार करून साकारली जात आहे, ती निश्चितच सर्वांना लाभदायी ठरेल. - अभिजित बापट, मुख्याधिकारी