नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगावजवळ दोन मोटारसायकलींचा अपघात झाला. यामध्ये पाठीमागून आलेल्या मोटारसायकलने उडविल्याने पुढील मोटारसायकलवरील महिलेचा मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाला. शकुंतला शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सातारहून कऱ्हाडच्या दिशेने निघालेल्या एमएच १४ टी १३०७ व एमएच १५ सी ४५११ या दोन मोटारसायकलींमध्ये अपघात झाला. पाठीमागून येत असलेल्या मोटारसायकलने पुढे निघालेल्या मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये शकुंतला शिंदे (वय ५०) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णात दादा शिंदे (दोघे रा. कालगाव), विशाल आनंदराव जगताप, भगवान एकनाथ बनकर (दोघे रा. सातारा) हे तिघे जखमी झाले. या अपघाताची बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास कदम तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
मोटारसायकल अपघातात महिला ठार; तिघे जखमी
By admin | Updated: June 7, 2015 00:28 IST