वाई : गुन्हा दाखल करू नये म्हणून सहा हजार रुपयांची लाच घेताना वाई पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ पकडले. सोनाली शेषराव गोडबोले असे ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकलेल्या महिला उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांत गुन्हा दाखल केला जाऊ नये म्हणून तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची मागणी तिने केली होती. तक्रारदाराने ‘एसीबी’शी संपर्क साधल्यानंतर उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनानुसार सापळा रचण्यात आला. आपला भाऊ विनोद शेषराव गोडबोले (वय २९) याच्याकरवी लाच स्वीकारण्याचे सोनाली गोडबोलेने ठरविले होते. त्यानुसार वाईच्या गणपती मंदिराजवळील एका हॉटेलमध्ये विनोद याने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारले आणि त्याचवेळी पंच, साक्षीदारांसमक्ष विनोदला रंगेहाथ पकडण्यात आले. सोनाली आणि विनोद गोडबोले या दोहोंविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)
महिला फौजदार जाळ्यात
By admin | Updated: July 16, 2015 01:07 IST