राजेंशिवाय सेनापती लढाई जिंकणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:43 PM2019-09-19T23:43:08+5:302019-09-19T23:43:12+5:30

सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत रंगत निर्माण झाली असून, शिवेंद्रसिंहराजेंना एकाकी वाटणारी निवडणूक आता वेगळे वळण घेऊ लागली ...

Without kings, the commander will win the battle? | राजेंशिवाय सेनापती लढाई जिंकणार ?

राजेंशिवाय सेनापती लढाई जिंकणार ?

googlenewsNext

सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत रंगत निर्माण झाली असून, शिवेंद्रसिंहराजेंना एकाकी वाटणारी निवडणूक आता वेगळे वळण घेऊ लागली आहे. त्यांचे विरोधक दीपक पवार यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय. तर शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक व अजूनही राष्ट्रवादीत असणारे जयवंत भोसले हे आयात उमेदवारांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊ नये, असे म्हणत आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील आमदारांनी राजे गेले तरी सेनापती लढतील, असा विश्वास व्यक्त करून राज्य खालसा करण्याच्या हालचाली सुरू केल्यात.
दोन महिन्यांपूर्वी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडली. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजेंना टक्कर देईल, असा उमेदवार राष्ट्रवादीला सापडत नव्हता. पुन्हा पुन्हा शशिकांत शिंदे यांच्या नावावरच येऊन घोडे अडत होते; पण आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे भाजपचा शिलेदार येत आहे. दीपक पवार हे गेली अनेक वर्षे भाजपमध्ये आपले आव्हान टिकवून आहेत. गत विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना चांगलेच आव्हान दिले होते; पण आता मतदारसंघातील चित्रच वेगळे झाले आहे. शिवेंद्रसिंहराजे भाजपवासी झाले आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी त्यांची उमेदवारीही जाहीर केली. यामुळे पवारांची गोची झालीय. विधानसभेसाठी पाच वर्षे तयारी करूनही पक्षाकडूनच त्यांना ठेंगा दाखविण्यात आला. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीचा मार्ग निवडावा लागला आहे.
खरे तर सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हॅट्ट्रिक केली आहे. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर सातारा आणि जावळी हे दोन तालुके मिळून एक मतदारसंघ निर्माण झाला. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अडचणी वाढल्या. त्यांना सातारा सोडून जावळीवर अधिक लक्ष द्यावे लागले. जावळीत त्यांनी आपले काही मावळे तयार केले; पण त्यांच्यावर कायम विसंबून राहता येईल, अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे जावळीतील त्यांच्या चकरा सतत वाढल्या.
जावळीतील लग्नकार्यापासून पारायणांच्या सोहळ्यापर्यंत त्यांची उपस्थिती होती. परळी खोऱ्यातून त्यांना सतत चांगली मदत झाली; पण जावळी कधी दगा देईल, सांगता येत नव्हते. तर गत निवडणुकीत सातारा नगरपालिका क्षेत्रातूनही शिवेंद्रसिंहराजेंना कमी मतदान झाले. यावेळी सगळे सूर जुळून आले होते; पण आता दीपक पवार राष्ट्रवादीत जाण्याने सर्व चित्र बदलणार आहे.
या बदलत्या राजकीय स्थितीत जावळीतून शिवेंद्रसिंहराजेंना वसंतराव मानकुमरेंची मदत किती होणार... शशिकांत शिंदेंची छुपी रसद राहणार का... आणि सातारा शहरातून भाजपसह उदयनराजेंच्या नगरसेवकांचे किती पाठबळ मिळणार, यावर बरेचसे गणित अवलंबून आहे. तरीही कोणावरही विसंबून न राहता आता त्यांना पुन्हा पळापळ करावी लागणार आहे. जावळी तालुका आणि सातारा शहरावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयानंतर आता दीपक पवार यांच्यासोबत असलेले इतर कार्यकर्ते काय निर्णय घेतात, हे देखील महत्त्वाचे असणार आहे.
सेनापतींनीही लढाया
जिंकल्याचा इतिहास..
साताºयाच्या इतिहासात राजेंनी आदेश द्यायचा आणि सेनापतींनी लढाया जिंकायच्या, असेच बºयाचदा घडलेले आहे. जेव्हा राजे मैदानात नव्हते तेव्हा सेनापतींनीच अटकेपार झेंडे लावले; त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उरलेले सेनापती हे म्हणतात ‘राजे नसतील तरी सेनापती लढतील.’ त्यांच्या या विधानामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? असा प्रश्न पडत आहे.

एकमेकांच्या मदतीने वाढली राष्ट्रवादी;
आता अडचणीत आणण्याचा प्रयत्न...
या विधानसभा मतदारसंघात पूर्ण जावळी तालुका येतो. या मतदारसंघात जावळीतून शिवेंद्रसिंहराजेंना शशिकांत शिंदे यांची मदत व्हायची. तर शशिकांत शिंदेंना सातारा तालुक्यातील खेड, वाढे, विलासपूर या परिसरातून कोरेगाव मतदारसंघासाठी शिवेंद्रसिंहराजेंची मदत व्हायची. आता दोघेही विरोधी पक्षात असल्यामुळे एकमेकांना मदत होणार की अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाणार, हे निवडणुकीतच कळणार आहे. आजूबाजूच्या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकमेकांना मदत झाली आणि पक्ष वाढत गेला आता तशी परिस्थिती राहणार नाही. यावेळी एकमेकांना शह देण्याचाच प्रयत्न होण्याची शक्यता अधिक आहे.

Web Title: Without kings, the commander will win the battle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.