प्रमोद सुकरेकराड : सातारा लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापायला लागले आहे. महाविकास आघाडी व महायुती यांचा उमेदवार मात्र अजूनही जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी या निवडणुकीतून माघार जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा सक्षम उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी 'कोण लढतंय का बघा नाहीतर मी तयार आहेच' असे माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितलेने शरद पवार त्यांची बंदूक पुन्हा एकदा शशिकांत शिंदेंच्या खांद्यावर ठेवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
खरंतर सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर शरद पवारांनी नेहमीच आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर तर हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच निर्माण झालेल्या दुहीमुळे आता पवारांचीच सत्वपरीक्षा येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात होणार आहे. त्याची पहिली कसोटी लोकसभा निवडणुकीत लागणार असून अचूक वेध घेण्यासाठी पवार आपली बंदुक पुन्हा एकदा माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर ठेवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
खरंतर शशिकांत शिंदे हे एक माथाडी नेते आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई. पण युतीच्या काळात जावली मधून सदाशिव सपकाळ आमदार झाले होते. त्यानंतर १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हा जावलीचा गड ताब्यात घेण्यासाठी थोरल्या पवारांनी एका माथाडी नेत्याला तेथे धाडलं अन गड ताब्यात घेतला.
त्यानंतर जावलीच्या राजकारणात ते रमले असतानाच कोरेगावच्या आमदार शालिनीताई पाटील शरद पवारांना गुरुगुरु लागल्या. तेव्हा या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी पवारांनी जावलीच्या वाघाला कोरेगावात धाडलं अन ताईंचा बंदोबस्त केला. मात्र पुन्हा दुसर्या एका शिंदेंनी त्यांना कोरेगावच्या मैदानात आसमान दाखवलं ही बाब ही दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यानंतर मात्र पवारांनी शिंदेंना ताकद देण्यासाठी म्हणून विधान परिषदेवर संधी दिली.
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील रिंगणात असतील अशी चर्चा होती. त्यांचे पुत्र सारंग पाटील हेही इच्छुक होते. मात्र या दोघांच्याही उमेदवारीला स्वकियांचाच विरोध झाला. मग दस्तूरखुद्द शरद पवार यांच्या समोरच श्रीनिवास पाटलांनी यंदा आपण निवडणूक लढवणार नाही असे जाहीर करून सर्वांना धक्का दिला.
श्रीनिवास पाटलांच्या माघारीच्या निर्णयानंतर नवे पर्याय शोधायला सुरुवात झाली. त्यात काही नावे पुढे आली पण त्यांनी समर्थता दाखवली नाही. त्यामुळे साताराला सक्षम उमेदवार कोण द्यायचा हा शरद पवारांच्या समोर प्रश्न ठाकला आहे. अशा वेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी 'कोणी लढतय का बघा नाहीतर मी आहेच' असा शरद पवारांना शब्द दिलाय. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा आपली बंदुक शिंदेंच्या खांद्यावर ठेवणार का? हे पाहावे लागणार आहे.
विधान परिषदेचे कालावधी अजून बाकी
आमदार शशिकांत शिंदे हे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचा अजून सुमारे अडीच वर्षाचा कार्यकाल बाकी आहे. त्यामुळे शरद पवार त्यांना संधी देणार की अन्य पर्याय शोधणार? हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
म्हणे भाजपमधून राजे निश्चितमहाविकास आघाडी कडून राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे इच्छुक आहेत.त्यांची भाजपने अधिकृत उमेदवारी जाहीर केली नसली तरी त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.