कऱ्हाड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत सातारा जिल्ह्याला मोठी संधी मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील यांच्यासह अर्धा डझन नेत्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी यायला मदत होईल, असे काही नेत्यांना वाटू लागलेय; पण त्यासाठी महत्त्वाचा असणारा काँग्रेसला कायम जिल्हाध्यक्ष मिळणार का? त्याची प्रतीक्षा कधी संपणार? याबाबतची दबक्या आवाजात काँग्रेसच्याच वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक बुरूज ढासळले. ते सावरायचे कसे? याचा विचार काँगेसजन करीत असतानाच, जिल्ह्यात भाजप-शिवसेनेनेही पाय पसरले. त्यामुळे आता काँग्रेसच्या हातात नेमकं काय उरलंय? याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीमधील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील यांचे स्वतंत्र गट व त्यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे. जिल्हा काँग्रेसवर अनेक वर्षे विलासराव पाटील-उंडाळकर यांचाच वरचष्मा होता. मात्र, युवक काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या आनंदराव पाटील यांनी प्रयत्नपूर्वक जिल्हा काँग्रेस कमिटी पृथ्वीराज चव्हाण गटाच्या ताब्यात घेतली.
पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणाऱ्या आनंदराव पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सुमारे १५ वर्षे सांभाळली; पण मध्यंतरी आमदार जयकुमार गोरे व आनंदराव पाटील यांच्यात संघर्ष सुरू झाला. गोरे यांनी नव्या जिल्हाध्यक्षचा आग्रह धरला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेवरून पाटील यांनी अध्यक्षपद सोडलेदेखील; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घातली; पण काही दिवसांतच त्यांनी हातात ‘कमळ’ घेतल्याने काँग्रेसचे नेते तोंडघशी पडले.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसचा हात सोडला. कमळाच्या चिन्हावर त्यांना खासदारकीची लॉटरी लागली. पण त्यामुळे वर्षभर जिल्हा काँग्रेसला जिल्हाध्यक्षच सापडला नाही. अनेक आघातातून सावरताना डॉ. सुरेश जाधव यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. पण त्यांच्याकडूनही काही उठावदार काम पाहायला मिळालेले दिसत नाही. त्यांच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदालाही आता वर्ष लोटले; पण कायम जिल्हाध्यक्ष सांगायचा काही मार्ग दिसत नाही.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची नुकतीच निवड केली. त्यात सातारा जिल्ह्यातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील, अजितराव पाटील, रणजित देशमुख, प्रदीप जाधव, राजेंद्र शेलार यांना संधी दिली आहे. राज्यात काही ठिकाणी जिल्हाध्यक्षांच्या निवडीही यावेळी झालेल्या आहेत. पण त्यात सातारा जिल्ह्याचा उल्लेख कोठेच दिसत नाही. त्यामुळे डॉ. जाधव प्रभारी म्हणून अजून किती काळ जिल्हाध्यक्ष पदावर उपचार करीत राहणार? हे समजायला मार्ग नाही.
चौकट
जावई आणि सासरे कारभारी!
सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. सुरेश जाधव हे काम पाहात आहेत. तर सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा विराज शिंदे सांभाळत आहेत. शिंदे हे जाधवांचे जावई आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची सूत्रे सध्या सासरे आणि जावई यांच्या हातात असल्याची चर्चा सुरू आहे.