आॅनलाइन लोकमतसातारा, दि. 9 - कऱ्हाड येथे बुडणाऱ्या दोन मित्रांना वाचविण्याच्या प्रयत्नात पंधरा वर्षीय शाळकरी मुलगा नदीत बुडाला. सैदापूर, ता. कऱ्हाड येथे खोडशी बंधाऱ्यानजीक मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रथमेश विजय वाडकर (वय १५, रा. करंजे, सातारा) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. पोलीस, स्थानिक ग्रामस्थांसह पाणबुडे रात्री उशिरापर्यंत प्रथमेशचा नदीपात्रात शोध घेत होते. मात्र, तो मिळून आला नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, करंजे-सातारा येथील प्रथमेश वाडकर याने नुकतीच नववीची परिक्षा दिली आहे. शाळेला सुट्या लागल्याने सुमारे पंधरा दिवसांपूर्वी तो सैदापूर येथे मामांकडे राहण्यास आला. सोमवारी घरात कोणास काहीही न सांगता तो दोन मित्रांसमवेत खोडशी बंधाऱ्यानजीक पोहायला गेला. प्रथमेशसह त्याच्या दोन्ही मित्रांना पोहता येत नव्हते. तिघेही नदीत उतरताच दोन मित्र बुडायला लागले. त्यामुळे प्रथमेशने धाडस करून त्या दोघांना काठावर ढकलेले. तो स्वत:ही पात्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, त्यामध्ये त्याला अपयश आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ, पोलीस व प्रथमेशचे नातेवाईक त्याठिकाणी पोहोचले. ग्रामस्थांनी पात्रात प्रथमेशचा शोध सुरू केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो सापडला नव्हता.
मित्रांना वाचविताना मुलगा बुडाला नदीत
By admin | Updated: May 9, 2017 21:00 IST