सातारा : दिवाळीचा बोनस, अॅडव्हान्स पगारामुळे अनेकांच्या बँक खात्यात बक्कळ पैसा आला आहे. त्यात प्रत्येकाकडे दोन-दोन बँकांचे एटीएम असल्याने जास्त पैसे काढून ठेवण्याची सवय मोडली आहे. बाजारात गेल्यावर एटीएममधून पैसे काढण्याची सवय लागली असली तरी दिवाळीत मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याने एटीएम मशिने रिकामे झाले आहेत. बँकेत पैसा आहे; पण एटीएम रिकामे झाल्याने अनेकांचा खिसाही रिकामा झाला आहे. त्यातच पै-पाहुणे आले आहेत. त्यांच्या मुलांना कपडे घेण्यासाठी बाजारात आलेल्या ग्राहकांचे हाल झाले. आतमध्ये गेल्यावर पैसे नसल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे चौकातून दुसऱ्या चौकात पळापळ करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. शिरवळ : शिरवळ व परिसरातील विविध बँकांच्या एटीएम सेंटरचा बोजवारा उडाला आहे. एटीएम सेंटर बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. शिरवळ पारिसरात भारतीय स्टेट बँक, जनसेवा बँक, बँक आँफ महाराष्ट्र, बँक आँफ बडोदा, युको बँक, युनियन बँक आदी राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम सेंटर आहेत. दीपावलीच्या सलग बँकांना सुट्या आल्याने शिरवळ व परिसरातील बँकांचे एटीएम सेंटर शोपीस बनले आहेत. काही एटीएम सेंटरवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना विशेषत: महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागला. (प्रतिनिधी)
एटीएम कार्ड असलेल्या बँकेव्यतिरिक्त अन्य बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. मर्यादा ओलांडल्याच खर्च घेतला जात असेल तर बँकांनी त्यांचे एटीएम कायम भरलेले ठेवण्याची जबाबदारीही बँकांची आहे. - हुशेनबाशा मुजावर, सातारा