नितीन काळेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषद सभापतीपदाची संधी तुम्हाला मिळेल, आता थांबा. वर्षानंतर बदल करु, असा शब्द मिळाल्यामुळे अनेक इच्छुक थांबले. पण, वर्षानंतरही त्यांच्या पदरात काहीच नाही. राष्ट्रवादी नेत्यांनीही विद्यमानांनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे इच्छुक नाराज असून, ‘दिलेला शब्द कधी खरा होतो का?’ हे एका सदस्याने वर्षभरापूर्वी केलेले वक्तव्य आता खरे होताना दिसून येत आहे.
पाच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. पुढीलवर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही सदस्यांनी सभापतीपद मिळावे म्हणून देव पाण्यात ठेवले होते. कारण, पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर गतवर्षी जानेवारी महिन्यात सभापतींची निवड झाली. त्यावेळी सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे अनेक सदस्य इच्छुक होते.
राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व इतर नेत्यांनी राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच जिल्हा परिषद सदस्यांची मते जाणून घेतली होती. सर्वांनीच सभापतीपदाची आशा व्यक्त केली होती. त्यावेळी राजकीय नेत्यांनी फक्त औपचारिकता पार पाडण्याचे काम केले. कारण, त्यांच्या मनात नेमके वेगळेच सुरू होते, हे सभापतीची नावे जाहीर झाल्यावर दिसून आले. या दरम्यान घडलेल्या राजकीय उलथापालथीत दावेदार कधीच मागे पडले होते तर नेत्यांनी त्यांची समजूत घातली. त्यामुळे नेत्यांच्या शब्दाखातर अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली. त्यावेळी नेत्यांनी नाराज झालेल्या सदस्यांना वर्षभरानंतर खांदेपालट करु. तुम्हाला संधी मिळेल, असे जाहीर केले होते. आता या निवडीला व शब्दालाही वर्ष होऊन गेले तरी त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही.
मुंबईत मंगळवारी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे काही पदाधिकारीही उपस्थित होते. मात्र, या बैठकीत निर्णयच झाला नाही. आगामी निवडणुकांचे कारण देत जिल्हा परिषद सभापती बदल नको, असा एक मतप्रवाह पुढे आला. त्यामुळे निर्णयाविनाच ही बैठक झाली. त्यामुळे सभापती बदलावर पुन्हा चर्चा घडून येईल, अशी स्थिती नाही. परंतु, वर्षभरापूर्वी दिलेल्या शब्दाला मोल नव्हतं एवढे मात्र स्पष्ट झाल्याचे अनेक सदस्यांनी सांगितले.
चौकट :
सभापतीपद मिळवलेलेही पुन्हा शर्यतीत...
जिल्हा परिषदेतील काही सभापतीपदे बदलण्याबाबत हालचाली वेगाने सुरू होत्या. अनेक इच्छुकांनी आपापल्या नेत्यांच्या कानावर वारंवार बदलाचा विषय घेतला. त्यानंतर याबाबत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर नवीन काही इच्छुक तयार झाले. त्यातच यापूर्वी सभापतीपद मिळवलेले एकजण पुन्हा चर्चेत आले. अशा अनेक इच्छुकांच्या गर्दीत राजकीय गोंधळ नको म्हणूनच विद्यमानांना कायम ठेवण्याचा निर्णय तूर्तास झाल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.
...........................................................