कऱ्हाड : सन १९७१ च्या बांगला मुक्ती संग्रामातील जवानांसाठी व शहीद जवानांच्या स्मरणार्थ जयहिंद फौंडेशनच्या वतीने संपूर्ण देशभर शौर्याजली यात्रा सुरू आहे. कऱ्हाड शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यानात या शौर्ययात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. शौर्ययात्रेचे प्रमुख संग्रामसिंह तोमर व प्रिन्स ठाकूर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कराड तालुक्यातील विरमाता व विरपत्नींचा संग्रामसिंह तोमर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास दत्तात्रय पवार, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, प्रा. भगवान खोत, तेजस पवार, मकरंद देशमुख, वैभव कदम, अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव विलासराव जाधव यांनी कऱ्हाडमध्ये कर्नल संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी १४, १५, १६ डिसेंबर रोजी विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दिवस समारोह समितीच्या वतीने देशातील एकमेव असा विजय दिवस साजरा केला जातो. त्याविषयी माहिती सांगितली व विजय दिवस समारोह समितीचे वतीने संग्रामसिंह तोमर यांचा सत्कार करण्यात आला.संग्रामसिंह तोमर म्हणाले, अनेक राज्यांतून शौर्य यात्रेची वाटचाल सुरू आहे. अनेक ठिकाणी आमचे स्वागत करण्यात आले. पण कऱ्हाड मध्ये आमचे मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत व सन्मान करण्यात आला. त्यामुळे आम्ही खूप प्रभावित झालो आहोत. त्यातून आपले सैनिकांच्या बाबत आदर व प्रेम दिसून आले. विरमाता,विरपत्नी व जवानांचा सत्कार करताना आपली देशभक्ती व देशासाठी या भूमीचे योगदान पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ही भूमी, संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचे हे गाव स्वच्छ परिसर स्वच्छ शहर, सर्व सोयी सुविधा हे सर्व पाहून आमची शौर्य यात्रा यशस्वी झाली आहे याचा आम्हाला अभिमान व आनंद वाटत आहे.
शौर्यांजली यात्रेचे कऱ्हाडात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 15:57 IST