सातारा : सातारकरांना दर्जेदार नाट्यांची अनुभूती देणारे शाहू कलामंदिर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. याच्या नूतनीकरणाचे काम येत्या १५ दिवसांत मार्गी लावण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या आहे. येथील कामकाजाची पाहणी केली असून, लवकरच हे कलादालन रंगकर्मींसाठी खुले करू, असा विश्वास उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी व्यक्त केला.
खा. उदयनराजे भोसले यांच्या सूचनेवरून उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी शुक्रवारी दुपारी थेट स्थावर जिंदगी विभागाला पाचारण करून शाहू कलामंदिरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. हे रंगमंदिर नूतनीकरणाच्या निमित्ताने वर्षभर बंद राहिल्याने रंगकर्मींमध्ये अस्वस्थता पसरली होती. शाहू कलामंदिर तत्काळ सुरू करण्यासाठी सर्व रंगकर्मींनी एकत्र येऊन नगराध्यक्षा माधवी कदम यांना निवेदन सादर केले होते.
नूतनीकरणाचे काम लांबणीवर पडल्याने शाहू कलामंदिर कधी सुरू होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, खा. उदयनराजे यांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना १५ दिवसांत शाहू कलामंदिर सुरू करण्याच्या सूचना केल्याने कामकाज पुन्हा गतिमान झाले आहे. येथील कामकाजाचा आढावा घेऊन काही दिवसांत हे कलादालन खुले केले जाईल, असा विश्वास मनोज शेंडे यांनी व्यक्त केला आहे.