कऱ्हाड: काहीजण लपून-छपून देव दर्शनाला जातात, पण आम्ही दिवसाढवळ्या जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कऱ्हाडमधील पत्रकार परिषदेत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. आमच्या पक्षात इनकमिंग जोरदार आहे. तुम्ही फक्त वर्षावर एक माणूस ठेवा बघायला, अशी कोटी देखील मुख्यमंत्र्यांनी केली.कऱ्हाड येथे नवीन शासकीय विश्रामगृहाच्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेश शिंदे, शहाजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होतमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही ५० जण कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. तुमचं सगळं चांगलं झालं की परत देवीच्या दर्शनाला या, असं निमंत्रण तेथील मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. कामाख्या देवी जागृत आहे. त्यामुळे दर्शनाहून परत आल्यावर आणखी इनकमिंग वाढेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.कऱ्हाडमधील कार्यक्रम हे शासकीय प्रोटोकॉलनुसार होते. त्यामुळे अजित पवार यांना डावलण्याचे कारणच नाही. मागील सरकारमध्ये आम्ही एकत्रच होतो. आता तर मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे कुणाला डावलण्याची काय गरज? माझ्या सहकार्याबद्दल आपण माहिती घ्यावी. तुम्ही विरोधी पक्षाला खासगीत विचारले तर माझ्या सहकार्याबद्दल ते सांगतील, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांचीच फिरकी घेतली.मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद हा राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. समितीमधील आमचे मंत्री तेथील लोकांशी चर्चा करून माहिती घेतील. सरकार त्यांच्या प्रश्नांसाठी कुठेही कमी पडणार नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न आमच्या अस्मितेचा असल्यामुळेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या आदेशाने बेळगावला जाऊन पोलिसांच्या लाठ्या खाल्लेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता जे कोणी बोलत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्याची मला गरज वाटत नाही
काहीजण देवदर्शनाला लपून-छपून जातात, आम्ही उघडपणे जातो; मुख्यमंत्र्यांचे टीकाकारांना प्रत्युत्तर
By प्रमोद सुकरे | Updated: November 25, 2022 19:33 IST