कऱ्हाड : चौपदरीकरणाच्या कामासाठी रस्ता खुदाई करताना मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने गेल्या चार दिवसांपासून ओगलेवाडीतील पाणीपुरवठा बंद आहे़ बुधवारी गळती काढण्याचे काम पूर्ण झाले तरी गुरूवारी पाणीपुरवठा न झाल्याने ओगलेवाडीकरांना नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी पाण्यासाठी वणवण भटकावे लागले़ अखेर माजी सरपंच धनाजी माने यांनी स्वखर्चाने टँकरच्या सहाय्याने ग्रामस्थांना पाणी वाटप करण्यात आले़ ओगलेवाडी रस्ता चौपदरीकरणाच्या कामास वर्षभरापूर्वी सुरूवात झाली़ मात्र ठेकेदारांच्या नियोजनशून्य कामाचा फटका ओगलेवाडीकरांना सहन करावा लागत आहे़ मनाला येईल तिथे खुदाई करून आर्धवट स्थितीत काम सोडून दुसऱ्या ठिकाणी खुदाई करण्याचे उद्योग ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू आहेत़, तर चौपदरीकरणाच्या कामासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटार काढताना ठिकठिकाणी वाहिनी फुटल्याने वर्षभरापासून ओगलेवाडी व हजारमाचीतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे़ आता रस्ता खुदाई सुरू असून मोठ्या प्रमाणात वाहिन्या फुटत आहेत़ गेल्या शनिवारी ओगलेवाडीच्या मुख्य चौकात रस्त्यात खुदाई करताना जेसीबीमुळे सदाशिवगड प्रदेशिक योजनेच्या मुख्य वाहिनीला गळती लागली़ शनिवारी फुटलेल्या वाहिनीची दुरूस्ती बुधवारी करण्यात आली़ तरीही गुरुवारी पाणीपुरवठा बंदच राहिला़ मुळातच शनिवारी जलवाहिनी फुटल्यानंतर पाचव्या दिवशी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले़ एवढा ढिसाळपणा का झाला, असा सवाल उपस्थित होत आहे़ (प्रतिनिधी)नववर्षाचे स्वागत तहानेनेगेल्या वर्षभरापासून वारंवार विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थ वैतागलेले असतानाच, चार ते पाच दिवसांपासून पुन्हा पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे़ गुरुवारी सर्वत्र नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत होत असताना ओगलेवाडीकर मात्र पाण्यासाठी भटकंती करताना दिसत होते़ याची दखल घेत माजी सरपंच धनाजी माने यांनी स्वखर्चाने खासगी टँकरच्या माध्यमातून काही भागांत पाणीपुरवठा केला़
गळतीमुळे ओगलेवाडीत पाणीटंचाई
By admin | Updated: January 5, 2015 00:39 IST