चाफळ : उत्तरमांड धरणग्रस्तांनी प्रलंबित मागण्यांसाठी व प्रकल्पाचे उपअभियंता व्ही. व्ही. मुंजाप्पा यांनी दिलेल्या धमकीच्या विरोधात धरणावरील पाणी सोडण्याच्या जॅकवेलच्या इमारतीस टाळे ठोकून निषेध नोंदविला होता. मात्र, याला माजगाव येथील शेतकऱ्यांनी विरोध करीत टाळे तोडण्याचा इशारा दिला. अखेर धरणग्रस्तांनीच मंगळवारी इमारतीचे टाळे काढून टाकत नदीपात्रात पाणी सोडले.गत चौदा वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या मागण्यांसाठी माथनेवाडीचे धरणग्रस्त आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहेत. प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून धरणग्रस्तांनी जलसमर्पण आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्या अनुषंगाने दि.१६ रोजी प्रांताधिकाऱ्यांनी धरणग्रस्तांच्या व्यथा समजून घेतल्या होत्या. या बैठकीस गैरहजर राहिलेल्या धरणाच्या अधिकाऱ्यांकडून धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ एकावडे यांना फोनवरून झालेली दमबाजी व त्यामुळे झालेल्या वादाचा चेंडू अखेर धरणग्रस्तांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या कोेर्टात टाकला. आमदार देसाई यांनी मला विचारल्याशिवाय उत्तरमांड धरणातील पाणी सोडायचे नाही, असे संबंधित अधिकाऱ्यांना कळवा. तोपर्यंत पाणी सोडण्याच्या खोलीला कुलूप लावा, असे सांगितले होते. आमदार देसार्इंच्या सांगण्यानुसार माथनेवाडीच्या धरणग्रस्तांनी कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी जॅकवेलच्या इमारतीस टाळे ठोकले होते. मात्र, धरणाचे पाणी नदीपात्रात न सोडल्यामुळे चाफळसह माजगावमधील सुमारे पंधराशे एकर क्षेत्रातील ऊस, गहू, हरभरा या पिकांचे पाण्याअभावी मोठे नुकसान होत असल्याने माजगाव येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत इरिगेशने इमारतीचे टाळे गुरुवारपर्यंत न काढल्यास गनिमी काव्याने टाळे काढण्याचा इशारा दिला होता. माजगाव ग्रामस्थांच्या इशाऱ्याचा धसका घेऊन धरणग्रस्तांनी मंगळवारी दुपारी इरिगेशन इमारतीचे कुलूप काढून नदीपात्रात पाणी सोडण्यास परवानगी दिली. (वार्ताहर)
उत्तरमांड प्रकल्पातून पाणी सोडले
By admin | Updated: January 21, 2015 23:56 IST