सातारा : शहरातील तामजाईनगर येथील रुद्राक्ष रेसिडेन्सीमध्ये एका वॉचमनला मारहाण केल्याप्रकरणी माण तालुक्यातील वरकुटे म्हसवड येथील महेशकुमार सुखदेव जाधव याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तामजाईनगर येथील रुद्राक्ष रेसिडेन्सीमध्ये नंदकुमार बाबूराव कांबळे (वय ५७, रा. भुईंज, ता. वाई, ) हे वॉचमन आहेत. मंगळवारी (दि. २) नंदकुमार हे ड्युटीवर असताना महेशकुमार जाधव तेथे आला. त्याने 'सचिन मोरे यांना फोन लावा,' असे वॉचमन नंदकुमार कांबळे यांना सांगितले. यावेळी नंदकुमार सोसायटीचे रजिस्टर पाहत होते. याचवेळी जाधव याने त्यांच्या नाकावर आणि डोळ्यावर फाईट मारली. या घटनेनंतर वॉचमन नंदकुमार यांनी महेशकुमार याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला.