सातारा : वनवासवाडी (खेड) येथील वहिवाटीचा रस्ता अडथळा निर्माण करून अडवल्याप्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.
सातारा कोरेगाव ऱस्त्यावरील जोतिबा मंदिर ते नाईक वीटभट्टी पाणंद रस्ता खुला करून वाहतूक योग्य करण्याची मागणी केली आहे. गेली अनेक वर्षे वनवासवाडी येथील पाणंद रस्ता वहिवाट म्हणून ग्रामस्थ वापरत असून, सध्या हा वहिवाट रस्ता जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करून अडवण्यात आला आहे. याबाबत वारंवार निवेदने व तक्रार अर्ज देऊनही उपोषण करून याबाबत वारंवार लेखी ठराव करूनही ग्रामपंचायत खेड कोणतीही कार्यवाही करत नसून याबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही त्वरित करावी, अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्याधिकारी सातारा, जिल्हा परिषद, प्रांताधिकारी, सातारा शहर पोलीस स्टेशन यांना पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती वनवासवाडी ग्रामस्थ मनोज लोखंडे, स्वप्नील लोखंडे व प्रशांत पोतदार यांनी दिली.