सातारा/वाई : रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नवविवाहितेचा अतिदक्षता विभागातच विनयभंग केल्याच्या आरोपावरून संबंधित पीडित महिलेच्या नातेवाइकांनी वॉर्डबॉयला बेदम मारहाण केली. त्यामध्ये वॉर्डबॉयचा मृत्यू झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. ही घटना आज, रविवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. संबंधित पीडित नवविवाहिता ही पतीसमवेत मुंबई येथे वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या सासूचे निधन झाल्याने ती गावी आली आहे. दरम्यान, काल, शनिवारी रात्री नवविवाहितेची प्रकृती अचानक खालावल्याने तिला वाई येथील डॉ. घोटवडेकर यांच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले होते. त्या विभागात रात्री इतर रुग्ण नव्हते. त्यामुळे पीडित नवविवाहिता आणि वॉर्डबॉय तुषार रवींद्र जाधव (वय २४, रा. रामडोह आळी, वाई) हे दोघेच होते. पहाटे पावणेपाचच्या सुमारास अचानक त्या नवविवाहितेला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तिने वॉर्डबॉय तुषारला याची कल्पना दिली. तुषारने तिला भुलीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याने त्या नवविवाहितेशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मात्र, भुलीचे इंजेक्शन दिले असले तरी पीडित नवविवाहितेला आपल्या अंगाशी कोणीतरी चाळे करीत असल्याचे जाणवत होते. काही वेळानंतर भूल उतरल्यावर हा प्रकार तिच्या लक्षात आला. त्यानंतर तिने सकाळी पती आल्यावर हा प्रकार त्यांना सांगितला. संतप्त झालेल्या पतीने नातेवाइकांना आणि मित्रांना या प्रकाराची माहिती दिली. काही वेळातच गावातील सहा ते सातजण डॉ. घोटवडेकर यांच्या रुग्णालयात आले. वॉर्डबॉय तुषारला रुग्णालयाच्या तिसर्या मजल्यावर त्यांनी नेले. तेथे त्याला या प्रकाराबाबत जाब विचारीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर संबंधित पीडित नवविवाहितेच्या नातेवाइकांनी वाई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तुषारवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. वाई पोलिसांनी तुषारला जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात नेले. त्यावेळी तुषारला दरदरून घाम आला होता. तसेच तो ‘छातीत दुखत आहे,’ असे पोलिसांना सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला तत्काळ वाई येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, अचानक त्याची प्रकृती खालावल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच तुषारचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. ज्या लोकांनी तुषारला मारहाण केली, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याचेही पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) महिनाभरातील दुसरी घटना गेल्या महिन्यात वाई तालुक्यात एका व्यक्तीने युवतीचा विनयभंग केला. त्या व्यक्तीचा पीडित युवतीने डोक्यात खोरे मारून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. संबंधित पीडित युवतीने तो खून केला नसून, तिच्या वडिलांनी केला असल्याच्या संशयावरून पोलिसांनी वडिलांनाही ताब्यात घेतले. सध्या पोलीस या प्रकरणाचा छडा लावत आहेतच; परंतु अशाच प्रकारची घटना वाईमध्ये पुन्हा घडल्याने विनयभंग करणार्या आरोपीला संतप्त जमावाच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
जमावाकडून वॉर्डबॉयचा खून
By admin | Updated: May 26, 2014 01:19 IST