सातारा : गेले अनेक वर्षे वाई, खंडाळा व महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात क्रीडा संकुल नसल्याने तरुणांची गैरसोय होत आहे. या ग्रामीण भागातील तरुणांकडे खेळाडूवृत्ती व गुणवत्ता असून त्याला वाव मिळत नव्हता. सरावासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात सुसज्ज क्रीडा संकुल व्हावे, अशी मागणी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडे केली. यावर या ठिकाणी तत्काळ क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वाई, खंडाळा व महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय खेळ्या करत आहेत. एकमेकांवर कुरघोड्या करून राजकीय पोळ्या भाजायच्या अन् राजकीय स्वार्थ साधणारे लोकप्रतिनिधी या भागात आहेत. या लोकप्रतिनिधींना चपराक देणारी खेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी खेळली आहे. या ग्रामीण भागातील तरुणांकडे खेळाडूवृत्ती व गुणवत्ता असून त्यांना योग्य तो वाव मिळण्यास व्यासपीठ नव्हते. सरावासाठी जागा उपलब्ध होत नाही. यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यावर विराज शिंदे यांनी लक्ष घालत राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांना निवेदन देत सर्व परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यावर केदार यांनी संबंधित क्रीडाधिकाऱ्यांना तत्काळ क्रीडा संकुलाचा प्रश्न सोडवा, असे आदेश दिले. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, आ. दीपक चव्हाण, क्रीडा अधिकारी युवराज नाईक व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ : फलटण येथे क्रीडामंत्री सुनील केदार यांना विराज शिंदे, डॉ. सुरेश जाधव व इतरांनी निवेदन दिले.
फोटो नेम : १४शिंदे