वाई : कोरोना वैश्विक संकट असून समाजातील प्रत्येक घटक यामध्ये भरडला जात आहे. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मंडळांनी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. उत्सवाच्या निमित्ताने जनजागृती करावी, अतिवृष्टीमुळे संकटात असणाऱ्यांना मदत करावी. मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास मंडळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिला.
वाई शहरातील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, भारत खामकर, महेंद्र धनवे, सतीश वैराट, बापूराव खरात, पोलीस कॉन्स्टेबल बापूराव मदने, प्रदीप भोसले, वाई नगरपालिकेचे बांधकाम अभियंता सचिन धेंडे, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक भरणे म्हणाले, ‘गणेशोत्सवाबाबत शासनाने नियमावली दिली आहे, तिचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळासाठी ही चार फुटांपेक्षा अधिक उंचीची असू नये. तसेच घरगुतीसाठी दोन फूट उंची अपेक्षित आहे. आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत. गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून फेसबुक व व्हिडीओ माध्यमांचा वापर करावा. गणेशोत्सव काळात होणारा खर्च हा अतिवृष्टी झालेल्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी करावा. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवावेत. गणेशाच्या आगमनापूर्वी मंडळांनी धर्मादाय संस्थेकडून परवानगी काढावी. त्यासाठी लागणारी पोलीस ठाण्याची परवानगी आवश्यक आहे.’
नगराध्यक्ष अनिल म्हणाले, ‘गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक अंतर ठेवत उत्सव साजरा करावा. गणेशोत्सवासाठी यावेळी मंडपावर खर्च करू नये, आरती वेळी फक्त चार कार्यकर्ते असावेत. दररोज कार्यकर्ते बदलण्यात यावेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उत्सव साजरा करावा.’
गणेशोत्सव मंडळातील काही कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या. अमित सोहनी, काशिनाथ शेलार, अजित शिंदे, भारत खामकर, महेंद्र धनवे, सतीश वैराट यांनी गणेशोत्सव साजरा करताना पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करावे, नियमाचा अवडंब माजवू नये, वाई शहरातील गणेश मंडळे कोणत्याही नियमाचा भंग करणार नाहीत, शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना रुग्ण जास्त आहेत. याची खबरदारी मंडळे नक्कीच घेतील असेही यावेळी सांगितले.