सातारा : जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपूर्वी लाॅकडाऊन करण्यात आले. यामध्ये अनेकांनी नियमाचे उल्लंघन केले. त्यामध्ये सर्वाधिक विनामास्कच्या कारवाई करण्यात आल्या. दोनशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत दंडाची रक्कम होती. यातून प्रशासनाने दहा पाच नव्हे तर तब्बल पन्नास लाखांचा दंड वसूल केला आहे.
जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोरोनाची भीषण परिस्थिती होती. रुग्णालयात रुग्णांना बेड मिळण्यासाठी धावा धाव करावी लागत होती. एकंदरीत कोरोनाचे रुग्ण आणि बळींचा आकडा वाढत होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक लाॅकडाऊन केले. नियमाचे काटेकोर पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली. या वेळी पोलिसांनी अवैध दारू वाहतूक, ट्रिपलसीट, अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना वाहन चालवणे, विनामास्क घराबाहेर पडणे अशा प्रकारे नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत होते. त्यामुळे सरसकट सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अनेकांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या. यातूनही मोठी दंडाची रक्कम जमा झाली. अचानक ऑलआऊट ऑपरेशन राबविले जात होते. त्यामधूनही मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या.
विना लायन्सस सर्वाधिक दंड
लाॅकडाऊन काळात अवैध प्रवासी वाहतूकही सुरू होती. या वेळी पोलिसांनी वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचे परवाने मागितले. मात्र, अनेकांकडे परवाने नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेषत: महामार्गावर या कारवाया करण्यात आल्या आहेत.
शहरात तीव्र कारवाई
सातारा शहर आणि कऱ्हाडमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुचाकीवरून विनाकारण बाहेर फिरणे, तोंडाला मास्क न लावणे, या कारवायांचा समावेश आहे. या दोन शहरातून तब्बल ३ लाख ७० हजार २६८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अद्यापही या प्रकारच्या कारवाया सुरूच आहेत.
लाॅकडाऊनमध्ये पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेतली. रस्त्यावर उभे राहून अवैध प्रवासी वाहतूक असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन असेल, या सर्वांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. त्यामुळे लोकांना शिस्तही लागली. तसेच कोरोना बाधितांची संख्याही कमी होऊ लागली.
सजन हंकारे- पोलीस निरीक्षक, सातारा तालुका