सातारा : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत शुक्रवारी (दि. १७) जिल्ह्यात महास्वच्छता दिन साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता करण्यात येणार असून, यामध्ये हजारो ग्रामस्थांचा सहभाग राहणार आहे. यामुळे गावे चकाचक होण्यास मदत होणार आहे.
स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन व अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये २५ ऑगस्टपासून पुढील १०० दिवस विविध उपक्रम, तसेच स्थायित्व व सुजलाम् अभियान सुरू राहणार आहे. या अंतर्गतच १७ सप्टेंबरला सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत सर्वच गावांत महास्वच्छता दिन साजरा करण्यात येणार आहे.
दरम्यान, या अभियानांतर्गत सामूहिक श्रमदान करण्यात येणार आहे. गावातील सर्वच ठिकाणे स्वच्छ करून कचरा संकलन व वर्गीकरण करण्यात येणार आहे. तसेच पाणी स्रोताच्या ठिकाणीही स्वच्छता केली जाणार आहे. शोषखड्डा निर्मिती, स्वच्छता विषयक घोषवाक्य भिंतीवर लिहिण्यात येणार आहे. शाळा, अंगणवाडी येथे पाण्याची सुविधा निर्माण करणे, सार्वजनिक शौचालय निर्मिती व रंगकाम करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करणे, प्लास्टिक बंदीविषयक कार्यवाही, आदी उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये सर्व शासकीय यंत्रणाचे जिल्हा, तालुका व गावस्तरीय अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, तसेच तरुण, गणेश, महिला मंडळे, बचतगट, आदींचा सक्रिय सहभाग घेऊन गावे शाश्वत स्वच्छ केली जाणार आहेत, असे सांगण्यात आले.
कोट :
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी महास्वच्छता दिन साजरा करण्यात येणार आहे. गावांत स्वच्छता करताना कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. तसेच सर्व ग्रामपंचायतीने महास्वच्छता दिनात सहभागी व्हावे.
- उदय कबुले, अध्यक्ष जिल्हा परिषद
\\\\\\\\\\\\\\\\\