वाठार स्टेशन : पाणी फाऊंडेशन संस्थेने कोरेगावसह महाराष्ट्रातील तीन तालुक्यांची निवड केली आहे. या तालुक्यातील गावांसाठी काही निकष जाहीर करुन ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ जाहीर केली आहे. ही स्पर्धा जिंकण्याचा बिचुकले ग्रामस्थांनी चंग बांधला असून गावातील जवळपास २०० ग्रामस्थ, युवकांनी सलग ४५ दिवस गावात श्रमदान करण्याचा निर्धार केला आहे.आजपासून सुरु झालेली सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सलग ४५ दिवस चालणार आहे यातील प्रथम विजेत्या गावाला ५० लाख, द्वितीय क्रमांकाला ३० लाख व तृतीय क्रमांकाला २० लाखांचे बक्षीस मिळणार आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या गावासाठी एकूण शंभर गुणांचे निकष लावण्यात येणार आहेत. यामध्ये श्रमदानास ५० गुण, मशिनने केलेल्या कामास २५ गुण, लोकसहभाग १० गुण, जलजागृती प्रयत्न १० गुण व नावीन्यपूर्ण उपक्रमास ५ असे निकष लावण्यात येणार आहेत. यानुसार ज्या गावांना अधिक गुण मिळणार ते गाव या स्पर्धेतील विजेता ठरणार आहे.महाराष्ट्रातील दुष्काळ हटविण्यासाठी अभिनेते आमीर खान, मुकेश अंबानी व सचिन तेंडुलकर यांनी पाणी फाउंडेशनची स्थापणा केली असून केवळ शासकीय मदतीवर किंवा निसर्गावर अवलंबून न राहता लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून जनजागृती व जलजागृती करण्याचे काम संस्थेमार्फत केले जात आहे.कायम दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बिचुकले गावाने काळाची पावले ओळखून ना राजकारण, ना पक्ष, जलसाक्षरता व ग्रामविकास हे आमचे लक्ष्य असा नारा देत गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गाव परिसरात जलसंधारण, ग्रामस्वछता व दुष्काळनिवारणाच्या कामास प्राधान्य दिले आहे. या उपक्रमासाठी समाजसेवक डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील संभाजी अण्णा यांच्या नेतृत्वाखाली श्रमदान ग्रुप या नावाने संस्था स्थापण केली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून गावातील शेकडो युवक, ग्रामस्थ आता कामाला लागले आहेत.दुष्काळ हटविण्यासाठी आता संपूर्ण गाव कामाला लागले आहेत. सरपंच साधना पवार यांनीही जलसंधारणाच्या कामास प्राधान्य देत ४५ दिवसांच्या कामाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार बुधवारी पहिल्याच दिवशी या गावाने आज वनराई बंधाऱ्याचा गाळ काढण्याचे काम केले आहे. (वार्ताहर)
‘वॉटर कप’साठी बिचुकले ग्रामस्थ सरसावले
By admin | Updated: April 20, 2016 23:25 IST