औंध
महाराष्ट्रातील कारखानदारी क्षेत्रात अनेक चढ-उतार आहेत. दुष्काळी भागातील या कारखान्याने गतवर्षीपासून कारखाना गळीत हंगाम लवकर सुरू केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राच्या कारखानदारी क्षेत्रात वर्धन दिशादर्शक ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
खटाव तालुक्यातील घाटमाथा त्रिमली येथे वर्धन ॲग्रोच्या पाचव्या गळीत हंगाम प्रारंभ व कोरोना योध्दयांचा सत्कारप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री विश्वजित कदम, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, जनार्दन कासार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, तहसीलदार किरण जमदाडे, चेअरमन धैर्यशील कदम, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, सुनीता कदम, सागर शिवदास, संचालक संपतराव माने, सत्वशिल कदम, कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
थोरात म्हणाले, कोरोना महामारीच्या संकटामुळे साखर कारखान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वर्धन ॲग्रोने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून गळीत हंगामात घेतलेली आघाडी कौतुकास्पद आहे. यापुढील काळात वर्धन ॲग्रोला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
धैर्यशील कदम म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवा-अडवी व जिरवाजीरवीचे राजकारण थांबविण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठबळावर वर्धनची उभारणी केली आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र वर्धनची टीम कार्यरत आहे.
कारखानदारीबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी शेतीमाल साठवणूक करण्यासाठी गोडावून उभारणी करण्यात येईल. कामगारांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी कामगारांना एक पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच लवकरच १०० बेडचे हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे म्हणाले, जवळपास २०० हून अधिक गावात कोरोना काळात वर्धनने मदत केली आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, वर्धन कारखान्यात सामाजिक बांधिलकी जपली जात आहे, हे आजच्या कार्यक्रमावरून सिद्ध झाले आहे. यावेळी विठ्ठलस्वामी महाराज, सागर शिवदास, संपतराव माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी केले. संचालक भीमराव डांगे यांनी आभार मानले.
चौकट
सत्काराने कोरोना योध्दे भारावले
महामारीच्या संकटात जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले आहे. वर्धनने कोरोना योध्दयांचा मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सन्मान केल्यामुळे ग्रामविकास अधिकारी, डॉक्टर, सेविका मदतनीस, आशा स्वयंसेविका, पत्रकार भारावून गेले होते. कार्यक्रमाला स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन शेळके, दादा पुजारी, संजय निकम, मानसिंगराव माळवे, हिम्मतबापू माने, सतीश सोलापुरे, दीपक लिमकर, अण्णासाहेब निकम, धनाजी पावशे, डॉ अमित ठिगळे, डॉ. स्नेहा डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फोटो:-त्रिमली घाटमाथा येथील वर्धन ॲग्रोच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी काटा पूजन करताना बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, विश्वजित कदम, धैर्यशील कदम, विक्रमशील कदम उपस्थित होते. (छाया-रशिद शेख)