सातारा : जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असून बुधवारी सायंकाळच्या सुमारास सातारा शहरालाही झोडपले. सुमारे १५ मिनीटे पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहिले. तर पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाडा कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस हाेत आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे फळबागांना फटका बसला आहे. त्यातच मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज कोठे ना कोठे पाऊस पडत आहे. सातारा शहरातही बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी पाऊस झाला. शहरात दुपारच्या सुमारास कडक ऊन पडले होते. तसेच उकाड्याने जीवाची घालमेल होत होती. दरम्यानच, आज, सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. बघता-बघता पावसाने जोर धरला. यामुळे सातारच्या बाजारपेठेत विक्रेत्यांची तसेच ग्राहकांचीही पळापळ सुरू झाली. तसेच पावसात साहित्य भिजू लागल्याने विक्रेत्यांची झाकण्यासाठी धांदल उडाली. या पावसामुळे शहरातील गटारे भरुन वाहिली. तर रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत होते. तसेच रस्त्यावरील वाहनांचीही वर्दळही कमी झाली होती. सुमारे १५ मिनीटे पाऊस पडत होता. याचवेळी शहरातील काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
साताऱ्याला पुन्हा पावसाने झोडपले; वीजपुरवठा खंडित, विक्रेत्यांसह नागरिकांची धांदल उडाली
By नितीन काळेल | Updated: April 24, 2024 19:08 IST