वाई : वाईच्या काही भागांत अतिवृष्टीमुळे
घरे, जमीन, रस्ते यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन सार्वजनिक सुविधाचेही नुकसान झाले. दुर्गम भागातील बहुतांश गावांना डोंगरातील नैसर्गिक झऱ्यातून पाइपलाइनच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा केला जातो. गोळेगावला क्षेत्र महाबळेश्वरवरून डोंगरातून चारशे मीटर पाइपलाइन करून वर्षभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो परंतु अतिवृष्टीमुळे जलवाहिनीचे मोठे नुकसान झाले होते. समाजातील काही दानशूर मंडळींनी एकत्र येऊन ही पाणी योजना पुन्हा सुरू केली आहे.
दुर्गम भागातील गोळेगाव येथील पाण्याची अडचण दूर करण्यासाठी उपसरपंच जितेंद्र दिलीप गोळे यांनी पंकज जुनंझ्या यांना जलवाहिनी देण्याची विनंती केली होती. गोळेगाव गावच्या पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन पंकज जुनंझ्या यांनी गोळेगाव गावासाठी एक हजार फूट दीड इंची जलवाहिनी दिली. तसेच नरेंद्र सिंग मनराल आणि
इंदू नरेंद्र मनराल (सणस) यांच्याकडून गोळेवाडी ज्ञानेश्वरवाडीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रॅव्हिटी लाइनकरिता सव्वा इंची एचडीपी दीडशे मीटर पाइप देण्यात आला. यामध्ये धोम बलकवडी प्रकल्प विभाग वाई डेपोटी इंजिनिअर अरीकर साहेब यांचे विशेष सहकार्य मिळाले.
गोळेगावमधील ग्रामस्थांनी पंकज जुनंझ्या, उपसरपंच जितेंद्र गोळे आणि धोम बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांचे सहकार्याबद्दल कौतुक केले. सर्व ग्रामस्थांनी श्रमदान करीत पाइपलाइन जमिनीमध्ये पुरून टाकली आणि तात्पुरत्या स्वरूपात पिण्याची जलवाहिनी सुरू केली.