कुडाळ : ऊन, वारा, पाऊस या परिस्थितीत पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. पावसाळा सुरू झाला की, पावसात भिजत नाकाबंदी करावी लागते. कुडाळ गावचे उपसरपंच यांच्या घरातच वडील आणि मोठा भाऊ पोलीस असल्याने त्यांच्याबद्दल मनामध्ये जिव्हाळ्याची भावना होती. यामुळे पावसापासून संरक्षण व्हावे, या भावनेतून कुडाळ पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना उपसरपंच सोमनाथ कदम यांनी छत्र्यांचे वाटप केले.
याबाबत कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे पीएसआय महेश कदम यांनी उपसरपंच सोमनाथ कदम यांनी दिलेल्या छत्रीची किंमत पैशात मोजता येणार नाही. त्यामागे त्यांची असणारी तळमळ व भावना लाख मोलाची आहे. त्यांनी पोलिसांप्रती दाखवलेला प्रेम व जिव्हाळा निश्चितच प्रेरणादायी आहे, असे सांगून त्यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी उपसरपंच सोमनाथ कदम, प्रवीण मोरे, सचिन वारागडे, समीर डांगे, विजय चिकणे, रणजित कदम तसेच पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.