सातारा : गणेशोत्सवात डीजे वाजविण्यावरून खासदार उदयनराजेंनी जिल्हा प्रशासनाशी पंगा घेतला असून ‘जब तक रहेगा गणपती...तब तक बजेगा डीजे,’ अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला आव्हान दिले आहे.गणेश मिरवणुकीत डीजे वाजविण्यास पोलीसांनी विरोध दर्शविला आहे. कायद्यानुसार डीजे वाजविण्याचा प्रयत्न झाल्यास गुन्हे दाखल होतील आणि या गुन्ह्यांत पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, तरुणांचे करिअर बरबाद होऊ शकते, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे. मात्र, खा. उदयनराजेंनी थेट पोलिसांना आव्हान दिले असून कोणत्याही परिस्थितीत डीजे वाजविला जाईल, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात पोलीस विरुद्ध उदयनराजे असा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. गतवर्षी गणेश विसर्जनावरून वाद उफाळला होता. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी विसर्जनानंतर तळ्यांची स्वच्छता करण्याबाबत न्यायालयात हमीपत्र लिहून द्या, असे पालिकेला सुनावल्यानंतर उदयनराजे भलतेच भडकले होते. यंदाही विसर्जन विहिरीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘डीजे’वरून उदयनराजेंचे थेट प्रशासनाला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 05:07 IST