फलटण : ‘तालुक्याबाहेरील व्यक्तींना आमच्या तालुक्याविषयी व कारखान्याविषयी बोलण्याचा काहीही अधिकार नाही. कारखान्याचा निकाल आमच्या बाजूने लागल्यानंतर त्यांना थोबाडीत मारल्यासारखे होणार आहे. आमचे घर गरिबांच्या पायावर झुकते; पण तुमच्यापुढे आम्ही वाकणार नाही. उलट विधान परिषदेचे सभापतिपद गेले तरी चालेल; पण जिल्ह्याच्या राजकारणातून उदयनराजेंची दहशत कायमची घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला. गुणवरे (ता. फलटण) येथे श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीत श्रीराम पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, दिलीप गावडे, शिवरूपराजे खर्डेकर, भीमदेव बुरुंगले उपस्थित होते. रामराजे म्हणाले, ‘जिल्ह्यात यांची दहशत प्रचंड वाढली आहे. त्यांना त्याचे काहीही वाटत नाही. त्यामुळे माझे विधान परिषदेचे सभापतिपद गेले तरी चालेल; पण यापुढे जिल्ह्याच्या राजकारणातून कायमची दहशत संपविणार आहे. आम्हालाही जशास तसे लढता येते. आमचेही कार्यकर्ते कमी नाहीत. आडवे आलेल्यांना सरळ करण्याची ताकद कार्यकर्त्यांकडे आहे. आमच्या नादी लागू नका.’
उदयनराजेंची दहशत संपविणार
By admin | Updated: April 5, 2015 00:01 IST