लोणंद : लोणंद-फलटण रस्त्यावर सरहद्देच्या ओढ्यानजीक शनिवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एकजण ठार झाला असून एकजण जखमी आहे. नितीन सूर्यकांत करपे असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, लोणंद-फलटण रोडवर नितीन सूर्यकांत करपे (वय ३८, रा. फरांदवाडी ता. फलटण) हे दुचाकी (एमएच ११ सीसी २२४५) वरून लोणंद येथून आपल्या फरांदवाडी येथील घरी निघाले होते. लोणंद ते फलटण जाणारे रोडवर सरहद्दीच्या ओढ्यानजीक आले असताना फलटण बाजूकडून लोणंद बाजूकडे जाणारे पुरुषोत्तम मिलिंद लोंढे (रा. बरड ता. फलटण) या युवकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच ४२ एके ४०२०) ही निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालविली. समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नितीन करपे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुरूषाेत्तम लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस फौजदार डी. आर. पाडवी तपास करीत आहेत.