खंडाळा : खंडाळा येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून दोन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. खिडकीत ठेवलेल्या चावीच्या साह्याने चोरट्यांनी घराचे कुलूप उघडले. गुरुवारी भरदिवसा चोरी झाल्याने खंडाळ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, खंडाळ्यातच आणखी एका ठिकाणी चोरी झाली असून, त्याची नोंद झालेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळ्यातील शासकीय विश्रामगृहाजवळ प्रवीण ढमाळ हे बांधकाम व्यावसायिक राहतात. गुरुवार, दि. १० रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास ते घर बंद करून बाहेर गेले होते. त्यावेळी खिडकीत ठेवलेली चावी घेऊन चोरट्यांनी बंद घराचे कुलूप काढले. घरात असलेल्या कपाटाचे दार स्क्रू-ड्रायव्हरच्या साह्याने उघडून कपाटातील सर्व साहित्य खाली काढले. घरातील हॉलमधील टेबलवर हे साहित्य ठेवून त्यातील नकली दागिने बाजूला काढले. व सोन्याचे साडेचार तोळ्यांचे गंठण व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. याची किंमत १ लाख ९५ हजार रुपये होते. या घटनेची खंडाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक सुरेश जावीर तपास करत आहेत. (प्रतिनिधी)श्वानाने दाखविला डांबरी रस्त्यापर्यंत मार्गचोरीची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी पाहणी केली. ठसेतज्ज्ञ तसेच साताऱ्यातून श्वानपथक बोलावून घेतले; मात्र श्वानपथकाने घरापासून चौकातील डांबरी रस्त्यापर्यंतच मार्ग दाखविला. त्यामुळे पोलिसांच्या हाती विशेष काहीच लागले नाही. खऱ्या-खोट्यांची पारखकपाटातील साहित्य बाहेर काढून चोरट्यांनी हॉलमधील टेबलवर ठेवून नकली दागिनी बाजूला काढले. तसेच नकली दागिने घेऊन पोबारा केला. लोणंद : येथील लोणंद-नीरा मार्गावर असणाऱ्या एका आॅटोमोबाईलच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व वाहनांचे टायर, असासुमारे पाच लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणंद-नीरा मार्गावर बाबूराव गोडसे (रा. तरडगाव) यांचे आॅटोमोबाईलचे दुकान आहे. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांचे एकूण ३९७ टायर व रोख ५० हजार रुपये, असा एकूण पाच लाखांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात टायर चोरून नेल्याने व्यापारी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. हे टायर चोरट्यांनी एखाद्या मोठ्या वाहनामधून चोरून नेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यानंतर बाबूराव गोडसे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र औटे तपास करीत आहेत. (वार्ताहर)
खंडाळ्यात भर दिवसा दोन लाखांची घरफोडी
By admin | Updated: September 11, 2015 23:41 IST