सांगली : महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यवसाय व अन्य स्वरुपाची माहिती लपविल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे मिरजेतील नगरसेवक जुबेर चौधरी व सांगलीतील सुनील कलगुटगी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी दिले आहेत. त्यानुसार शनिवारी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात महापालिकेचे अधिकारी बसून होते. मिरजेतील प्रभाग क्र. ८ अ मधील नगरसेवक जुबेर चौधरी यांच्याविरोधात २९ नोव्हेंबर २0१४ रोजी माजी नगरसेवक अजित दोरकर यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. या तक्रारीत म्हटले होते की, जुबेर चौधरी यांनी उमेदवारी अर्जात कोणताही व्यवसाय करीत नसल्याचा उल्लेख केला होता. वास्तविक त्यांच्या नावे स्टार व्हिडिओ सेंटर हे दुकान होते. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे परवानेही त्यांनी घेतले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या कागदपत्रांवरून चौधरी यांचा व्हिडिओ सेंटरचा व्यवसाय असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन व राज्य निवडणूक आयोगाच्या २0 फेब्रुवारी २0१३ रोजीच्या परिपत्रकानुसार निवडणुकीत कोणतीही माहिती लपविल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी दोरकर यांनी केली होती. दोरकर यांच्या तक्रारीची दखल घेऊन आयुक्तांनी जुबेर चौधरी यांना नोटीस बजावली होती. मुदतीत चौधरी यांनी आयुक्तांसमोर म्हणणे मांडले. व्हिडिओ सेंटरची मालकी असली तरी व्यवस्थापकामार्फतच तो व्यवसाय चालविला जातो, असा खुलासा त्यांनी केला होता. त्यानंतर आयुक्तांनी या खुलाशासह विधी विभागाचा अभिप्राय मागितला होता. महापालिकेच्या विधी विभागाने अहवाल देताना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सुचविले. त्यानुसार आयुक्तांनी आदेश दिले. सहायक आयुक्त व प्रशासन अधिकारी यांनी यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता करून फौजदारीची प्रक्रिया सुरू केली आहे. सांगलीच्या प्रभाग क्र. २२ ब मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील कलगुटगी यांच्यावरही फौजदारीचे आदेश देण्यात आले आहेत. जागेच्या क्षेत्रफळाची माहिती देताना तफावत दिसून आली असून दुचाकीच्या विक्री व मालकीसंदर्भातील कागदपत्रे सादर केली नव्हती. या कारणास्तव त्यांच्यावरही फौजदारी कारवाईचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दोन्ही नगरसेवकांवर एकाचवेळी शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी) राष्ट्रवादी अडचणीत राष्ट्रवादीचेच दोन्ही नगरसेवक कायदेशीरदृष्ट्या अडचणीत सापडल्यामुळे राष्ट्रवादीला झटका बसला आहे. फौजदारीच्या आदेशाची चर्चा शनिवारी महापालिका वर्तुळात सुरू होती. रात्री उशिरापर्यंत येथील शहर पोलीस ठाण्यात दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती.
दोन नगरसेवकांवर फौजदारी दाखल
By admin | Updated: June 7, 2015 00:34 IST