सातारा : एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नंदन बापू अडागळे (वय ४६) याला वीस वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सह. जिल्हा न्यायाधीश पटणी यांनी सुनावली.
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, पीडित मुलगी तिच्या घरात २४ जून २०१८ रोजी एकटी असताना आरोपी नंदन अडागळे याने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर या प्रकरणी संबंधित पीडित मुलीने २५ जून २०१८ रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३ व ४ नुसार आरोपी नंदन अडागळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. चव्हाण, अर्चना दयाळ यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर पीडितेच्या भावाची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तसेच मेडिकल पुरावे आणि पीडितेचा जबाब ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी नंदन अडागळे याला वीस वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे या खटल्याचे कामकाज सरकारी वकील नितीन मुके, ए. एस. घार्गे यांनी पाहिले. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक शुभांगी भोसले यांनी पैरवी अधिकारी म्हणून सरकार पक्षाला सहकार्य केले.
फोटो : ०१ नंदन अडागळे