सातारा : ‘वीज बिल भरा नाहीतर व वीज पुरवठा खंडित करू’ असा निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची असंवेदनशीलता पुन्हा दिसली आहे, वीज बिल भरण्याचे फर्मान म्हणजे सरकारच्या तुघलकी कारभाराचा नमुना आहे,' अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केली आहे.
कोरोना काळात वीज बिलांची थकीबाकी कोट्यवधींच्या घरात गेली. यावर महाराष्ट्र राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तरी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी करत भाजपच्यावतीने कृष्णानगर येथील महावितरणच्या कार्यालयास प्रतीकात्मक टाळे ठोकत निदर्शने करून ठिय्या मांडला.
कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार आश्वासन दिले जात होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेला वीजबिल माफीचे गाजर दाखवले आता गरज सरो आणि वैद्य मरो या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू आहे. आता हे राज्य सरकार सक्तीने वीज बिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसत आहे. मात्र, या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही. तसेच वीज पुरवठा खंडित करण्यास येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या काळात कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. युतीचे राज्य सरकार असताना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. पण वीज कंपन्यांही फायद्यात राहिल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिले वसुली करून आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका, असा इशारा देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, राजेंद्र इंगळे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, सुनिशा शहा, रिना भणगे, नीलेश नलावडे, विट्ठल बलशेटवार, सुनील जाधव, आशा पंडित, सुनील काळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथील वीज मंडळाच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. (छाया : जावेद खान)