शिरवळ : शिरवळ येथील केदारेश्वर मंदिराजवळ असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहात बांधकाम मजुराचा गळा चिरुन खून करण्याचा प्रयत्न अज्ञाताने केला. दिलीप पती मरांडी (वय १८, मूळ रा. भवानंद, ता. डोंबरी, पो. चाल्मूबरमसियाँ जि. गिर्डी, झारखंड. हल्ली रा. शिरवळ ता. खंडाळा) असे गंभीर जखमीचे नाव आहे.घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ येथे सध्या एका ठिकाणी बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी बांधकाम ठेकेदार बुमताज अन्सारी यांच्याकडे दिलीप मरांडी हा मजुरीचे काम करत आहे. शनिवार, दि. १८ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिरवळमधील केदारेश्वर मंदिराजवळ असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ दिलीप मरांडी व त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीत वाद झाला. यावेळी दिलीप मरांडी हा सुटीवर होता. वादावादीनंतर संबंधित व्यक्तीने दिलीप मरांडी याचा चाकूने गळा चिरुन खुनाचा प्रयत्न केला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या दिलीप मरांडी हा घटनास्थळापासून थोड्याच अंतरावरील केदारेश्वर कॉलनीतील पवार आळीतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत पळत गेला. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या कामगारांनी जखमी मरांडीला खासगी रुग्णालयात दाखल केले. यामुळे स्वच्छतागृह रक्ताने माखले होते. हल्लेखोर पळून गेला असून पोलीस शोध घेत आहेत. याची शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात नोंद झाली असून पोलीस निरीक्षक अशोक शेळके तपास करत आहेत. (प्रतिनिधी)