सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावर क्षेत्रमाहुली पुलाजवळ ट्रक, कार आणि पिकअप जीप यांच्यामध्ये आज, सोमवारी सकाळी तिहेरी अपघात झाला. अपघात झाला त्या ठिकाणी केवळ ५० मीटरवर क्षेत्रमाहुली पूल आहे. या पुलाच्या अलीकडेच अपघात झाल्याने ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’, याचा प्रत्यय आला. दरम्यान, अपघातामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. आज साताराहून माल भरून ट्रक कोरेगावकडे निघाला होता. सकाळी पावणेअकराच्या सुमारास ट्रक क्षेत्रमाहुली पुलाजवळ पोहोचल्यानंतर समोरून कार येत होती. याचवेळी कारच्या पाठीमागे जीप होती. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला होता. त्यामुळे कार घसरली.या कारला जीपने पाठीमागून धडक दिली. क्षेत्रमाहुली पुलाजवळ ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तेथे यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. याच ठिकाणाहून एक जीप खाली कोसळली होती. त्यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला होता. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने हे वळण प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहे. या अपघातप्रवण क्षेत्रामधील रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
क्षेत्रमाहुली पुलाजवळ तिहेरी अपघात
By admin | Updated: July 21, 2014 23:08 IST