फलटण : सस्तेवाडी हद्दीत विनापरवाना, बेकायदेशीररित्या कत्तलखान्याकडे नेण्यासाठी ठेवलेली ७१ जनावरे व वाहन फलटण ग्रामीण पोलिसांनी रोखले. त्यातील ७१ जनावरांची सुटका करून टेम्पो जप्त केला. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सस्तेवाडी हद्दीमध्ये एका शेतात मंगळवारी, दि. १४ रोजी दुपारी चारच्या सुमारास बेकायदा बिगरपरवाना कत्तल करण्यासाठी अंदाजे १० ते १५ पंधरा वर्षांच्या तीन गाई व सुमारे दोन ते पाच महिने वयाची ६८ खोंडे अशी ७१ जनावरे दाटीवाटीने डांबून ठेवलेली होती. या जनावरांच्या खाण्यापिण्याची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. जनावरे विनापरवाना कतलीसाठी नेण्यासाठी पिकअप् गाडी सुद्धा तेथे ठेवली होती. याची गोपनीय माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना समजताच तेथे छापा टाकून ७१ जनावरे व टेम्पो असा एकूण १६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल फलटण ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला.
याप्रकरणी अर्षद जलील कुरेशी, कबीर मोहम्मद शेख (दोघे रा. कुरेशी नगर, फलटण), मौला अमिन शेख (रा. सरडे, ता. फलटण) यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.