पर्यटकांचा हंगाम
यंदा देखील ‘लॉक’
महाबळेश्वर : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरात एप्रिल व मे महिन्यातील उन्हाळी सुट्टीत पर्यटकांचा अक्षरशः मेळा भरतो. येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील पर्यटक या पर्यटनस्थळांना भेटी देतात. यंदाच्या हंगामात पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनस्थळी हजेरी लावतील अशी आशा येथील स्थानिक नागरिकांना होती. मात्र, कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू झाली आणि महाबळेश्वर-पाचगणीला येणाऱ्या पर्यटकांची पावलेदेखील थांबली. पर्यटकांविना दोन्ही पर्यटनस्थळे ओस पडली असून स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.
बाजार समितीत खरेदीसाठी गर्दी
सातारा : जिल्हा परिषदेच्या मैदानावर दररोज सकाळी अडत व्यापारांचा बाजार भरतो. या ठिकाणी खरेदीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने हजेरी लावत असून फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. अनेक व्यापाऱ्यांकडून मास्कचा वापर केला जात नाही. शासननियमांचे पालन केले जात नाही. या गंभीर प्रकाराची जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
उकाडा वाढल्याने सातारकर हैराण
सातारा : सातारा शहर व परिसरात गतआठवड्यात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. सलग तीन ते चार दिवस झालेल्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता. मात्र, सोमवारी सातारकर उकाड्याने अक्षरशः हैराण झाले. हवामान विभागाने सोमवारी शहराचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. वाढत्या उकाड्यामुळे फळांना मागणी वाढली आहे.
गल्लीबोळांत चक्क क्रिकेटचे सामने
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध १५ मेपर्यंत वाढविले आहेत. या निर्बंधाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे; परंतु नागरिकांसह तरुणांकडून कोणताही नियम पाळला जात नाही. रात्र झाली की शहरातील अंतर्गत रस्त्यांवर तरुणाई एकत्र येऊन क्रिकेटचे सामने खेळण्यात दंग होत आहे. पोलिसांकडून अशा तरुणांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने गल्लोगल्ली क्रिकेट खेळणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.