कऱ्हाड (जि. सातारा) : महाराष्ट्रात पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. त्यामुळे जागतिक पर्यटन तज्ज्ञांची मदत घेऊन महाराष्ट्राचा पर्यटन विकास आराखडा नव्याने तयार करणार आहे. त्या आराखड्यानुसार महाराष्ट्राला पर्यटनात देशात एक नंबर राज्य करण्याचा आपला मानस आहे, असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
मंत्री देसाई म्हणाले, प्रतापगडाचा विकास आराखडा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच तयार केला आहे. त्याला काही प्रमाणात निधी दिला आहे. त्याचा दुसरा टप्पा मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून, येत्या बुधवारी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रतापगडाची पाहणी करणार आहे.