तरडगाव : संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा बुधवार दि. ६ रोजी तरडगाव मुक्कामी येत असून तत्पूर्वी चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण होणार आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांना सुविधा मिळाव्यात म्हणून ग्रामपंचायतीसह विविध विभागाच्यावतीने जय्यत तयारी केली आहे. तरडगावकर स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.यंदा लोणंद येथील एक दिवसाचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा दि. ६ रोजी येथे दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी तळाची स्वच्छता करण्यात आली आहे. तळावर पालखी मुक्कामासाठी आल्यावर विविध गावचे नागरिक, भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करीत असतात. त्यासाठी दर्शनबारीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. टेहळणीसाठी टॉवर उभारून फ्लडलाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. तर माऊलींच्या कटट्या सभोवती आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. दिंड्या जेथे राहुट्या टाकतात त्या ठिकाणच्या झाडे-झुडपांची विल्हेवाट लाऊन परिसर स्वच्छ करून रेलिंग केले आहे. तसेच अतिरिक्त नळजोड देखील देण्यात आले आहेत.वारीत सहभागी वारकऱ्यांना उत्तम अतिरिक्त सेवा देण्यासाठी आरोेग्य विभाग देखील सज्ज झाला असून त्यासाठी अतिरिक्त पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. परिसरातील ८१ विहिरींतील पाण्याची तपासणी करून पिण्या योग्य पाणी असणाऱ्या विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पाणी भरण्यासाठी फिलिंग पॉर्इंट तयार करण्यात आले आहेत.महसूल विभागाच्या वतीने वारकऱ्यांना पालखी कालात इंधनाची कमतरता भासू नये यासाठी रॉकेल व गॅसासाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. वीज पुरवठ्यातील दोष काढून ठिकठिकाणी दुुरुस्ती करून वीज पुरवठा पालखी काळात खंडीत होणार नाही, याची दखल वीज वितरण कंपनीच्या वतीने घेतली जात आहे.पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची चोख व्यवस्था करण्यात येत आहे. तळावर दर्शनादरम्यान लुटमारीच्या घटना घडू नयेत यासाठी गस्ती पथके नेमण्यात आली आहेत. तर बेवारस वस्तूंना हात न लावता तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करणारे फलक लावले आहे.पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची अन्नदानातून सेवा करता यावी यासाठी गावातील अन्नदाते, तरुण मंडळे, भजनी मंडळ आतूर झाली आहेत. येथील एक दिवसाच्या मुक्कामानंतर सोहळा गुरुवारी पहाटे पलटणकडे मार्गस्थ होणार आहे. (वार्ताहर)फलटण तालुक्यात प्रवेशसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे बुधवार दि. ६ रोजी लोणंद येथील एक दिवसांचा मुक्काम आटोपल्यावर खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात आगमन होत आहे. दरम्यान तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे दुपारच्या सुमारास वारीतील पहिले उभे रिंगण होणार असल्याने त्याकडे सर्वांचे डोळे लागले असून रिंगणानंतर तरडगाव मुक्कामी पालखी सोहळा विसावणार आहे.
तरडगावला आज माउलींचे पहिले उभे रिंगण
By admin | Updated: July 6, 2016 00:27 IST