नागठाणे : नागठाणे परिसरातील वीज वितरण कंपनीची सुमारे तीन हजार फूट लांबीची बावीस हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरीस गेली आहे. याबाबतची गणपती जोतिराम ढाणे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागठाणे-सासपडे मार्गावर नागठाणे वीज वितरण कंपनीचे अद्ययावत कार्यालय आहे. या कार्यालयाच्या अखत्यारित वळसे येथे उपकेंद्र आहे. गुरुवारी सकाळी वीज वितरण कंपनीचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे गणपती ढाणे, तसेच सोबत वीज वितरण कर्मचारी राजेंद्र फाळके हे वळसे ते भरतगाव दरम्यान लाईन चेक करत येत असताना भरतगाव ते नयना पेट्रोल पंप दरम्यानच्या लोखंडी खांबावरील पाच गाळ्यांतील सुमारे तीन हजार फूट लांबीची बावीस हजार रुपये किमतीची तांब्याची वायर कोणीतरी चोरून नेली असल्याचे निदर्शनास आले. याबाबत वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांना सविस्तर माहिती देऊन याबाबतची अज्ञातांविरुद्धची बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यानच्या काळात काही महिन्यांपूर्वी शेंद्रे, ता. सातारा येथूनही अशीच काही किमतीची कॉपर वायर चोरीस गेलेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
चौकट :
मागील काही महिन्यांपूर्वी शेंद्रे येथून तसेच आत्ताही भरतगाव येथून अशा प्रकारे वायर चोरीस गेल्या आहेत. त्यामुळे नाईलाजाने शेतातील वीजपुरवठा खंडित होत असून शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.
- अजित ढगाळे
सहायक अभियंता, नागठाणे विभाग.