खंडाळा / शिरवळ : पुणे-बंगलोर महामार्गावर केसुर्डी फाट्यानजीक काल, बुधवारी रात्री झालेल्या अपघातात उल्हासनगर (ठाणे) येथील तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. पवन संतोष मिश्रा (वय २४), गणेश बिचुप्रसाद गुप्ता (२४), इरफान गणी शेख-तांबोळी (२८, तिघेही रा. उल्हासनगर, ठाणे) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथील हे तीन मित्र एका कामासाठी कऱ्हाड येथे आले होते. काम पूर्ण झाल्यावर बुधवारी (दि. ११) तिघे दुचाकीवरून(एमएच ०४ एफएल ९२५८) उल्हासनगरकडे निघाले होते. केसुर्डी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर जानुबाई मंदिराशेजारी एका टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिली. यावेळी दुचाकीवरील तिघे खाली फेकले गेले. त्यानंतर ते जागीच ठार झाले. पोलिसांनी एका टेम्पो चालकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)
भीषण अपघातात तीन मित्र ठार
By admin | Updated: June 13, 2014 02:01 IST